लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धुळे – धुळेकरांना आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही. १७० कोटी रुपये खर्चातून अक्कलपाडा पाणी पुरवठा योजना उभारण्यात आली आहे. या योजनेमुळे आता धुळेकरांना दर दोन दिवसाआड पिण्याचे पाणी देण्यात येत आहे. हा आमच्यासाठी सुवर्ण दिवस आहे. आम्ही जो शब्द दिला होता, तो पाळला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले.

येथील अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचे जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी अध्यक्षस्थानी खासदार डॉ. सुभाष भामरे हे होते. कोनशिला अनावरण आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अमरिश पटेल, महापौर प्रतिभा चौधरी, महिला प्रदेश उपाध्यक्षा जयश्री अहिरराव, शहराध्यक्षा वैशाली शिरसाठ, राजवर्धन कदमबांडे, भाजप महानगराध्यक्ष गजेंद्र अपंळकर, विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-गिरणा खोऱ्यात पाणी वळविण्यास लोकप्रतिनिधी उदासीन, वांजुळ पाणी संघर्ष समितीची टीका

काही वर्षांपूर्वी धुळ्यात आरोग्य महाशिबिरावेळी देवेंद्र फडणवीस यांना धुळेकरांची पाण्याची समस्या सोडविण्यास सांगितले होते. पालकमंत्री झाल्यानंतर धुळेकर जनतेला पाणी देणार, असे आपण आश्वासन दिले होते. त्यानुसार १७० कोटी रुपयांची अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना आता पूर्ण झाली आहे. अक्कलपाडा धरणाच्या पूर्णत्वाचा प्रश्न ४० वर्षांपासून भिजत होता. मागच्या सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री असताना अक्कलपाड्याचे काम पूर्ण केले. अक्कलपाडा धरण पूर्ण बांधले असले तरी भरतो मात्र ६५ टक्केच. याचे कारण म्हणजे शेतकर्यांच्या शेतजमिनीच्या अधिग्रहणाचा प्रश्न आहे. तोही लवकरच सोडविला जाईल. त्यासाठी या आठवड्यात बैठक घेण्यात येईल, असे महाजन यांनी सांगितले.