लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: दिंडोरी तालुक्यात औद्योगिक क्षेत्राचा वाढता विस्तार आणि उद्योजकांना भेडसावणारे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडविण्याच्या उद्देशाने नाशिक इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) दिंडोरी कार्यालय कार्यान्वित केले जात आहे. या कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी.शेखर यांच्या हस्ते होणार आहे.
याबाबतची माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे आणि दिंडोरी उपसमितीचे प्रमुख नितीन वागस्कर यांनी दिली. निमाची नाशिक आणि सिन्नर येथे अद्ययावत अशी कार्यालये असून आता त्यात दिंडोरी कार्यालयाची भर पडणार आहे. दिंडोरी तसेच आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक विस्तार होत असून तेथील उद्योजकांना महावितरण, पायाभूत सुविधा, रस्ते, जिल्हा परिषद संलग्न विषय, ग्रामपंचायतीचे कर आदी समस्या भेडसावत आहेत. मध्यंतरी काही विघातक शक्तींकडून उद्योजकांना धमकाविण्याचे प्रकारही घडले होते. निमाने या प्रकरणात हस्तक्षेप करून त्याबाबत सामंजस्याने तोडगा काढला होता. भविष्यात असे प्रकार घडू नयेत आणि दिंडोरी व परिसरातील उद्योजकांचे प्रश्न स्थानिक पातळीवर मार्गी लागावेत, त्यांना नाशिकला येण्याची गरज भासू नये यासाठी दिंडोरी येथे निमाचे कार्यालय उघडावे, अशी मागणी दोन महिन्यांपासून जोर धरू लागली. पुढील औद्योगिक विकास दिंडोरी-तळेगाव, अक्राळे येथे मोठ्या प्रमाणात होणार आहे. रिलायन्स, इंडियन ऑईल तसेच अन्य बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले प्रकल्प उभारणीचे काम या ठिकाणी सुरू केले आहेत.
आणखी वाचा-नाशिक: मराठा-ओबीसी समीकरण; भाजप शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव, जिल्हाध्यक्षपदी शंकर वाघ
या बाबींचा विचार करून आणि दिंडोरीतील उद्योजकांना सोयी सुविधा त्याच ठिकाणी मिळाव्यात हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवत निमा कार्यकारिणीच्या बैठकीत तातडीने हा विषय मांडून दोनच महिन्यांत कार्यालय उघडण्याची संकल्पपूर्ती करण्यात आली. विवेक पाटील आणि योगेश पाटील यांच्या सहकार्यामुळे दिंडोरीवासीय उद्योजक आणि निमाचे हे स्वप्न साकार झाल्याचे बेळे आणि वागस्कर यांनी नमूद केले. दिंडोरी तालुक्यातील इंदोरे-रासेगाव मार्गावरील तळेगाव येथील गट क्रमांक ३२ येथील युनायटेड हीट ट्रान्सफर कंपनीत हे कार्यालय उघडण्यात येणार आहे. कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमाचे मानद सचिव राजेंद्र अहिरे, उपाध्यक्ष किशोर राठी, आशिष नहार आदींनी केले आहे.