जप्त रक्कम केवळ आठ लाख; कांदा व्यापाऱ्याची रोकड असल्याचा दावा
जुने चलन देऊन नवीन चलन देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करताना अडीच कोटीचे नवे चलन जप्त करण्यात आल्याची वदंता असली तरी ही रक्कम केवळ सात लाख ७० हजार रुपये असल्याचे समोर आले आहे. या घटनाक्रमाविषयी प्राप्तिकर विभागाने मौन बाळगल्याने या कारवाईविषयीचे गूढ कायम आहे. नोटांसह ज्यांना ताब्यात घेतले, त्यात शहरातील प्राचीन मंदिराच्या विश्वस्तासह एका संघटनेचा पदाधिकारी तथा शासकीय ठेकेदाराचा समावेश आहे. संबंधितांनी कांदा व्यापाऱ्याची ही रोकड असल्याची माहिती प्राप्तिकर विभागास दिली आहे. सोमवारी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकरणाशी संबंधित घटकांची सोमवारी अर्थतज्ज्ञांकडे धावपळ सुरू होती.
निश्चलनीकरणानंतर देशात ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात जुन्या व नवीन नोटा प्राप्तिकर विभागाच्या हाती लागत आहे. चलन तुटवडय़ामुळे सर्वसामान्य त्रस्तावले असताना धनदांडग्यांकडे मोठय़ा प्रमाणात रोकड सापडत असल्याचे अनेक कारवायांमधून समोर आले आहे. या घडामोडीत नाशिकही अपवाद ठरले नाही. ५०० व एक हजारच्या नोटा रद्दबातल झाल्यानंतर काही मंडळींकडून जुन्या नोटा बदलून देण्याचा नवा व्यवसाय सुरू झाल्याचे बोलले जाते. जिल्हा बँकेतही असे प्रकार घडल्याच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने बँकेतून संपूर्ण माहिती संकलीत केली होती. या घडामोडी सुरू असताना रविवारी रात्री प्राप्तीकर विभागाने नोटांच्या अदलीबदलीच्या संशयावरून दोघांना ताब्यात घेतले. एका हॉटेलमध्ये सापळा रचून ही कारवाई केली गेली. नोटा बदलून घेण्याकरिता संशयितांशी बनावट ग्राहक बनून प्राप्तिकर विभागाने संपर्क साधल्याचे सांगण्यात येते. या कारवाईत अडीच कोटींची रक्कम जप्त करण्यात आल्याची वदंता होती. पोलीस बंदोबस्तात दोघांना प्राप्तिकर विभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. या ठिकाणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते जमले. गर्दीला हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला.
या कारवाईत ताब्यात घेतलेल्यांकडून प्राप्तिकर विभागाने जबाब लिहून घेतले. त्यात ही रक्कम एका कांदा व्यापाऱ्याची असल्याचे संबंधितांनी म्हटले आहे. कृषिमाल व शेतीच्या वसुलीतून आलेली ही रोकड असून ती केवळ सात लाख ७० हजाराची आहे. या रकमेशी आपला कोणताही संबंध नाही. एका कार्यक्रमावरून परतत असताना मित्राने संपर्क साधल्यामुळे आपण त्या हॉटेलमध्ये भेटण्यास गेलो होतो. त्याचवेळी ही कारवाई झाल्याचे मंदिराचे विश्वस्त असणाऱ्या पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. संबंधित कांदा व्यापारी आणि संघटनेचा पदाधिकारी यांनी प्राप्तिकर विभागाला दिलेल्या जबाबात त्या रकमेशी आपला कोणताही संबंध नसल्याचे नमूद केल्याचा दावाही संबंधिताने केला.
अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेण्यासाठी धावपळ
प्राप्तिकर विभागाने कारवाई करताना दोघांना ताब्यात घेतले होते. परंतु, संबंधितांच्या जबाबावरून त्यात कांदा व्यापाऱ्याचाही समावेश झाल्याचे दिसून येते. कारवाईच्या कचाटय़ात सापडलेल्यांची अर्थतज्ज्ञांकडून सल्ला घेण्यासाठी धावपळ उडाली. या प्रकरणाबाबत प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोलण्याचे टाळले. परंतु, ही रक्कम दहा लाखांच्या आसपास असल्याचे मान्य केले. सोमवारी सुटी असली तरी बहुतांश अधिकारी कार्यालयात उपस्थित होते. उपरोक्त प्रकरणाची चौकशी सुरू असून फारसे काही सांगता येणार नसल्याचे प्राप्तिकर अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.