नाशिक : शहरातील १५ पेक्षा अधिक बांधकाम व्यावसायिक, त्यांच्याशी संबंधित महत्वाच्या व्यक्ती, कार्यालये या ठिकाणी आयकर विभागाने गुरूवारी सकाळी अचानक छापे टाकले. या कारवाईने बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आयकर विभागाच्या दिल्ली, मुंबई, पुणे येथील पथकासह अधिकारी, कर्मचारी असे ७५ हून अधिक जण या कारवाईत सामील आहेत. कारवाई सुरू असलेल्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हेही वाचा… धुळे: चारचाकी वाहने चोरणाऱ्या दोघांना अटक
हेही वाचा… नाशिक: संकेतस्थळातील तांत्रिक अडचणींमुळे पालकांना माहिती मिळण्यास अडथळा; आरटीई प्रवेश प्रक्रिया
शहरात क्रेडाईसह अन्य काही बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी गृह महोत्सव भरवला. या महोत्सवाची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेले प्लास्टिक फलक आदिवासी भागात घरांवर छप्पर तसेच अन्य कामासाठी वापरण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक कामांसाठी संघटना प्रयत्नशील असून सामाजिक बांधिलकी जपत काम सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. दुसरीकडे, बहुतांश बांधकाम व्यावसायिक करचुकवेगिरी करत असल्याच्या संशयातूनच गुरूवारी १५ बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, त्यांच्याशी संबंधित वकील, व्यवस्थापक यासह अन्य ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. छाप्यात गंगापूर रोड, कुलकर्णी गार्डन यासह अन्य भागातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचा समावेश आहे. यातील काही बांधकाम व्यावसायिक महापालिकेच्या विकास कामांचे बांधकाम करत आहेत. कारवाई नेमकी अघोषित संपत्तीच्या चौकशीसाठी की करचुकवेगिरी तपासण्यासाठी झाली, हे स्पष्ट झालेले नाही. कारवाईत बांधकाम व्यावसायिकांकडील कागदपत्रांची छाननी, बँक खात्याचा तपशील आदी माहितींची पडताळणी सुरू असून सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.