प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी सकाळपासून मुंबई नाका येथून किसान सभेच्या मोर्चाने मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. मोर्चेकरी हजारोंच्या संख्येने असल्यामुळे मार्गावर वाहतूक कोंडी होऊन नोकरदारांना फटका बसला. तसेच गुरुवारपासून १२ वीची परीक्षा सुरू झाल्याने मुंबई नाका ते विल्होळी परिसरातून नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रांवर येण्यासाठी विद्यार्थ्यांनाही विविध अडचणींना तोंड द्यावे लागले.
परीक्षा केंद्रात किमान अर्धा तास आधी उपस्थित राहण्याचा नियम मंडळाने केलेला असल्याने विद्यार्थ्यांना केंद्र गाठण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा आधार घ्यावा लागला. दुसरीकडे, बुधवारी सायंकाळपासून मुंबई नाका बस स्थानक परिसर मोर्चेकऱ्यांनी ताब्यात घेतल्याने बसगाडय़ा अन्य स्थानकातून सोडण्यात येत असल्या तरी प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
राज्य सरकारने आश्वासन देऊनही वर्षभरापासून पूर्ण न झालेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पुन्हा एकदा नाशिक ते मुंबई मोर्चा काढण्याच्या आवाहनास हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला.
पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी किसान सभेने बुधवारी दुपारपासून शहरातील मुंबई नाका बस स्थानक परिसरात तळ ठोकला. सायंकाळी उशिरापर्यंत तीन हजाराहून अधिक आदिवासी शेतकरी जमा झाले. ही गर्दी रस्त्यावर येऊन वाहतूक विस्कळीत होऊ नये म्हणूून पोलिसांना त्यांना मुंबई नाका बस स्थानक परिसरातच थांबविले. सुरक्षेच्या दृष्टीने बस स्थानक परिसरात दुभाजक टाकत मोर्चेकऱ्यांना बाहेर ये- जा करण्यासाठी बंधने घातली. याचा फटका बस स्थानकातील प्रवाशांनाही बसला. मोर्चेकऱ्यांचा पवित्रा पाहता कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंडळाने आपल्या गाडय़ा अन्य स्थानकातून सोडल्या. अचानक करण्यात आलेल्या या बदलाची पूर्वकल्पना प्रवाश्यांना नसल्याने त्यांना ठक्कर बाजार, मध्यवर्ती बस स्थानक परिसरात फेऱ्या माराव्या लागल्या. रात्री उशीरापर्यंत मोर्चासाठी पेठ, सुरगाण्यासह अन्य ठिकाणाहून खासगी वाहने शहरात दाखल होत होती. त्यामुळे मुंबई नाका ते पाथर्डी फाटा परिसर आणि त्या पुढील मार्गावर रस्त्याच्या कडेला खासगी वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे परिसरातील वाहतूक कोंडीत भर पडली. गुरुवारी सकाळी मोर्चाने मुंबईच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. मोर्चा निघण्याची आणि कामगार, नोकरदारांनी कामावर जाण्याची तसेच १२ वीच्या परीक्षार्थीनी बाहेर पडण्याची एकच वेळ झाल्याने नाशिककरांचे हाल झाले. मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने पुढे जात असला तरी या गर्दीमुळे पोलिसांनी मोर्चेकऱ्यांच्या रस्त्याला मिळणारे जोड रस्ते दुभाजक टाकून बंद केले होते. यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. आधीच स्मार्ट सिटी रस्त्याच्या कामामुळे त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ परिसरात वाहतुकीस अडचण येत असतांना मुंबई नाका ते पाथर्डी फाटा परिसरातून येणाऱ्या विद्यार्थी आणि नोकरदारांना मोर्चामुळे वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. दरम्यान, घरकुल योजना, वनपट्टे, पाणी प्रश्न आदी मागण्या पूर्ण करा अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. आमदार जे. पी. गावीत, किसान सभेचे अशोक ढवळे, सुनील मालुसरे आणि अन्य पदाधिकारी मोर्चेकऱ्यांचे नेतृत्व करीत आहेत.