लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांची बस पास काढण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थातच सिटीलिंकने शहरातील पास केंद्रांच्या संख्येत वाढ केली आहे.
विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यानंतर बस पासची संख्या कमी झाल्याने सिटीलिंकच्या वतीने पास केंद्रांची संख्या देखील मर्यादित करण्यात आली होती. परंतु, आता विद्यार्थी संख्या वाढणार असल्याने पुन्हा एकदा पास केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. त्यानुसार सद्यस्थितीत एकूण सहा पास केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये के.टी.एच.एम. महाविद्यालयाच्या ठिकाणी सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत एक पास केंद्र सुरू करण्यात आले आहे, निमाणी येथे सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत एका पास केंद्राची संख्या वाढविण्यात आल्याने निमाणी येथे सद्यस्थित दोन पास केंद्र सुरू आहेत. नाशिकरोड येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत एक पास केंद्र सुरू आहे. सिटीलिंक मुख्यालय येथे सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत तीन पास केंद्र सुरू आहेत.
सद्यस्थितीत एकूण चार ठिकाणी सहा पास केंद्र सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊन पास केंद्रावर गर्दी झाल्यास आणखी पास केंद्र देखील सुरू करण्यात येतील. परंतु, सद्यस्थितीत वरीलप्रमाणे उपलब्ध असलेल्या केंद्रावर जाऊन विद्यार्थी पास काढू शकतात. तसेच यासंदर्भात काही अडचण असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास सिटीलिंक हेल्पलाईन क्रमांक ८५३००५७२२२ / ८५३००६७२२२ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.