अनाथालयांचे आरोप वैद्यकीय संघटनांनी फेटाळले
काही वर्षांत कुमारी मातांची संख्या वाढली असली तरी त्या तुलनेत अनाथालयात दाखल होणाऱ्या बालकांची संख्या वाढली नाही. यामागे काही कुमारी माता अथवा वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्ती ‘त्या’ अर्भकांची विक्री करत असल्याचा अनाथालयांच्या संचालकांनी व्यक्त केलेला संशय तथ्यहीन असल्याचे वैद्यकीय संघटनांनी म्हटले आहे. कुमारी मातांना २० आठवडय़ांच्या आत गर्भपाताचा अधिकार आहे. त्यामुळे कुमारी माता आणि बालकांची संख्या यात तफावत असू शकते, याकडे वैद्यकीय संघटनांनी लक्ष वेधले आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय आरोग्य कुटुंब सर्वेक्षणात कुमारी मातांची (१५ ते १९ वयोगट) संख्या वाढल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण वाढण्यास विविध घटक कारणीभूत ठरले. कुमारी मातांची संख्या वाढत असताना अनाथालयात दरवर्षी दाखल होणाऱ्या बालकांचे प्रमाण मात्र त्या अनुषंगाने वाढले नसल्याचे अनाथालयांचे म्हणणे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील काही अपप्रवृत्तींमुळे नवजात अर्भकांची विक्री गरजू दाम्पत्याला होत असल्याचा संशय व्यक्त करत यात अशी साखळी सक्रिय असल्याचा आरोप अनाथालयांच्या संचालकांनी केला होता. मात्र हे आरोप वैद्यकीय संघटनांनी फेटाळले आहेत. राज्यस्तरावर कार्यरत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयमा) सचिव डॉ. पार्थवी संघवी यांनी मुळात कुमारी माता आणि प्रसूती झालेल्या माता यांची अधिकृत आकडेवारी कुठेही जाहीर झाली नसल्याचे स्पष्ट केले. या प्रक्रियेत गर्भपात करणाऱ्या महिलांचे प्रमाण लक्षात घ्यावे लागेल. तसेच असे अर्भक विक्री वा तत्सम प्रकार शहर परिसरातील मोठय़ा रुग्णालयांत होत नाही. त्यासाठी संबंधित युवती किंवा तिचे कुटुंब लहान नर्सिग होमचा आधार घेऊ शकतात. यातील किती कुमारी माता नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण करतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
नाशिक आयमाचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर यांनी अर्भक विक्रीसारखा कोणताही प्रकार शहरातील रुग्णालयांमध्ये होत नसल्याचा दावा केला. शहराची अजून वैचारिक वाढ त्या पद्धतीने झाली नसल्याची पुष्टीही त्यांनी जोडली. कोणाकडून अशी काही तक्रार आलीच तर त्याविषयी ते प्रकरण वैद्यकीय परिषदेसमोर मांडले जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रसूती संघटनेच्या राज्याध्यक्षा डॉ. कानन येलीकर यांनी कुमारी मातांचे वय आणि पुढील काही गोष्टींचा विचार केला तर त्या पालकत्व का स्वीकारतील? त्यांना कायद्याने २० आठवडय़ांच्या आत गर्भपाताचा अधिकार आहे. त्यामुळे कुमारी मातांची संख्या आणि बालक यात तफावत आहे. इथे पालकांना आपल्या पाल्यांच्या पालनपोषणात अडचणी येत असताना त्याची खरेदी हा विषय दूरच असल्याचे सांगत त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास असमर्थता दर्शविली.
नाशिक येथील प्रसूतीरोगतज्ज्ञ डॉ. संजय पवार यांनीही डॉ. येलीकर यांनी मांडलेल्या मुद्दय़ांचे समर्थन करत राज्यात असे काही प्रकार सुरू असल्याचा आरोप फेटाळला. काही अपप्रवृत्ती असल्या तर असे प्रकार महानगरांत होत असतील, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा