‘स्मार्ट सिटी’कडे वेगाने वाटचाल करणाऱ्या नाशिक शहरातील ‘माणुसकी’ तितक्याच वेगाने लुप्त होत असल्याचे विदारक चित्र असून डोळ्यासमोर काही विपरीत घटना घडत असताना एकतर बघ्याची भूमिका घेणे वा सोयीस्करपणे डोळेझाक करीत मार्गस्थ होण्याचा पर्याय स्वीकारण्याचा मुर्दाडपणा अगदी सहज दर्शविला जात आहे. त्याचे आणखी एक उदाहरण नुकतेच शहराच्या मध्यभागातील भरवस्तीत पुन्हा समोर आले.
अतिशय वर्दळीच्या रविवार कारंजा येथील एका अंतर्गत रस्त्यावर सोमवारी रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या ६० वर्षीय व्यक्तीला टोळक्याने बेदम मारहाण केली. वाहनाला कट का मारला, अशी विचारणा त्यांनी संबंधिताकडे केली होती. टोळके त्या ज्येष्ठ व्यक्तीला मारहाण करीत असताना बघ्यांपैकी एकही जण त्यांची सोडवणूक करण्यासाठी धावला नाही. उलट, आसपासच्या व्यावसायिकांनी आपली दुकाने झटापट बंद करीत कातडी बचाव धोरण स्वीकारले. काही जणांनी घटनाक्रम पाहून काढता पाय घेतला.
शहरवासीयांची संवेदनशीलता लुप्त होत असल्याचे याआधी काही घटनांमधून पुढे आले आहे. त्रिमूर्ती चौकात घडलेल्या अपघातात रस्त्यावर मृत झालेल्या शालेय विद्यार्थ्यांचे छायाचित्र काढण्यापासून ते कॉलेज रोडवर दुचाकी पेटल्यावर ती विझविण्याऐवजी तिचे ‘फोटोसेशन’ करण्याची मजा घेणाऱ्यांनी आपली मानसिकता वारंवार अधोरेखित केली आहे. कधीकाळी अनाहुतांच्या मदतीला धावून जाणाऱ्या नाशिककरांची बदलती मानसिकता आणि वृत्ती असंवेदनशीलतेच्या शिखराकडे वाटचाल करीत आहे. ‘माणुसकी’ या शब्दाचा विसर पडत आहे. त्याचे प्रत्यंतर रविवार कारंजा परिसरातील पेठे हायस्कूलच्या जवळून आत जाणाऱ्या रस्त्यावर घडलेल्या घटनेतून पुन्हा आले आहे.
सोमवारी रात्री आठच्या सुमारास एक ज्येष्ठ व्यक्ती या गल्लीबोळातून दुचाकीने जात होती. या वेळी मोटारसायकलवरून भरधाव आलेल्या तीन टारगट युवकांनी त्यांच्या वाहनाला कट मारला. वडीलकीच्या नात्याने संबंधित व्यक्तीने युवकांना याबाबत केलेली विचारणा वेगळे वळण घेणारी ठरली. टारगट युवकांनी वयाचे भान न राखता त्या व्यक्तीला शिवीगाळ केली. त्यातील एकाने भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपल्या काही साथीदारांना बोलावून घेतले. अवघ्या काही मिनिटांत त्यांचे साथीदार उपस्थित झाले. या सात ते आठ जणांनी त्या व्यक्तीला इतकी मारहाण केली की ती व्यक्ती रस्त्यावर आडवी पडली. हा सर्व प्रकार काही जण दूर उभे राहून शांतपणे जणू काही एखादा चित्रपट पाहावा त्याप्रमाणे पाहत होते. आसपासच्या दुकानदारांनी त्या ज्येष्ठ व्यक्तीला टोळक्याच्या तावडीतून सोडण्यासाठी पुढे येण्याची हिंमत दाखविण्याऐवजी दुकाने बंद करण्याचा डरपोकपणा दाखविला. वास्तविक, दुकाने बंद करण्याऐवजी सर्व दुकानदार तसेच उपस्थितांनी एकत्र येत त्या टोळक्याला प्रतिकार केला असता तर संघटित शक्तीपुढे गुंडांना हार पत्करावी लागली असती. पोलिसांना दूरध्वनी करूनही त्यांना त्या व्यक्तीला मदत करता आली असती. पण त्यांनी आपल्यापुरता विचार करून या वादापासून दूर राहणे पसंत केले. हीच वेळ उद्या आपल्यावरही येऊ शकते, याचाही विचार कोणी केला नाही. हा रस्ता पुढे फावडे गल्लीत जातो. आसपास दुकाने जशी आहेत, तसे काहींची लगतचे वाडे व इमारतीत निवासी घरे आहेत. हा सर्व गोंधळ सुरू असताना कोणालाही बाहेर येऊन हस्तक्षेप करावा, असे वाटले नाही. बेदम मारहाण केल्यावर टोळके मोटरसायकलवरून पसार झाले. ही घटना पाहणारे बघे मार्गस्थ झाले. जबरदस्त मारामुळे हतबल झालेली ज्येष्ठ व्यक्तीही नंतर निघून गेली. माणसांमधील असंवेदनशीलतेचा अजून एक अंक अशा प्रकारे कोणतेही उत्तर न देता संपला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा