धुळे – भारत विरुध्द दक्षिण अफ्रिका यांच्यात मंगळवारी झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर सट्टा (बेटिंग) लावणाऱ्या रायगड येथील संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेऊन त्याच्यासह या प्रकरणात सहभागी १२ संशयितांविरुद्ध येथील आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मंगळवारी धुळे शहरातील अग्रसेन पुतळ्यासमोरील हॉटेल अमित प्लाझामध्ये नीलेश रामप्रसाद राव (२७, कळंबोली, रायगड) नावाची व्यक्ती भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यातील एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर भ्रमणध्वनीव्दारे सट्टा लावत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने राव यास ताब्यात घेतले. राव याने भ्रमणध्वनीतील ऑल पॅनल नावाच्या बेटिंग ॲपव्दारे क्रिकेट सामन्यावर सट्टा लावत असल्याची कबुली दिली. उल्हास नगर येथील अन्य साथीदारांच्या मदतीने हा प्रकार सुरु असल्याचेही त्याने सांगितले. यामुळे राव याच्यासह १२ संशयितांविरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – नाशिक : ईपीएफ निवृत्तीवेतनधारकांचा रास्ता रोको

हेही वाचा – शासकीय सेवेत सामावून घेताना दुजाभाव – लघूवेतन सरकारी कर्मचारी संघाची निदर्शने

राव व्यतिरिक्त इतर १२ संशयितांचे केवळ भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

Story img Loader