हवामानाने साथ दिल्यास आज ओझरला उतरणार
अनिकेत साठे, नाशिक
भारत-पाकिस्तानच्या पहिल्या अर्थात १९४७ च्या युद्धात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या ‘डकोटा’ या वैशिष्टय़पूर्ण लष्करी मालवाहू विमानाचे नाशिकमध्ये होणारे आगमन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. ‘एअरो इंडिया’ प्रदर्शनाच्या प्रचार, प्रचारार्थ भारतीय हवाई दलाचे ‘डकोटा’ विमान दिल्ली ते बंगरुळू अशी सफर करणार असून त्याच्या ऐतिहासिक उड्डाण आणि उतरणात नाशिक साक्षीदार होणार आहे.
५ फेब्रुवारी रोजी बंगळूरूयेथील तांत्रिक कारणास्तव ते दिल्लीहून उड्डाण करू शकले नव्हते. गुरुवारी खराब हवामान आडवे आले. हवाई दलाने आता शुक्रवारचा दिवस निश्चित केला आहे. जवळपास चार दशकानंतर हे विमान पुन्हा हवाई दलास मिळाले असून तत्पूर्वी त्याची ६ वर्षे दुरुस्ती करण्यात आली. त्याच्या उड्डाणाचे निकष अतिशय कठोर असून सुरक्षित उड्डाण आणि डकोटाच्या जपवणुकीसाठी तारखांमध्ये फेरबदल करावे लागत आहेत.
संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीने २० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत बंगळुरू येथे एअरो इंडिया या जागतिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात जगभरातून लढाऊ विमान, हवाई दलाशी संबंधित साधन सामग्रीचे उत्पादक सहभागी होतात. या प्रदर्शनाच्या प्रचारार्थ हवाई दलाने डकोटाची दिल्ली ते बंगळुरू अशी ऐतिहासिक सफर आयोजित केली आहे. चंद्रशेखर यांचे वडील एम.के. चंद्रशेखर हे हवाई दलात एअर कमोडोर होते. त्यांनी अनेकदा या विमानाचे सारथ्य केले आहे. ६ वर्षांच्या दुरुस्तीनंतर त्यांच्या हस्ते नुतनीकरण झालेले डकोटा विमान हवाई दलास भेट देण्यात आले. दुरुस्ती प्रक्रियेत या विमानाच्या दिशादर्शन आणि तत्सम प्रणालीचे नुतनीकरण झाले. हवाई दलाच्या ताफ्यातील वैशिष्टय़पूर्ण, दुर्मीळ विमानांमध्ये डकोटाचा समावेश आहे.
डकोटाची लक्षणीय कामगिरी
हवाई दलात डकोटाची कामगिरी लक्षणीय राहिली असून १९३० मध्ये रॉयल इंडियन एअर फोर्समध्ये ते समाविष्ट झाले होते. १९४७ मध्ये पाकिस्तानने जम्मू-काश्मीरवर हल्ला केला. काश्मीरचा जो हिस्सा आज भारताच्या ताब्यात आहे, तो राखण्यात डकोटाने मोलाची भूमिका बजावली. शीख रेजिमेंटच्या जवानांना डकोटाने श्रीनगरला पोहोचविले. हे असे पहिले विमान होते, की लेहमधील ११ हजार ५०० फूट उंचीवरील धावपट्टीवर उतरले. हवाई दलाने १९४० ते १९८० या काळात डकोटा मालवाहू विमानाचा मोठय़ा प्रमाणात वापर केला. साडे तीन दशकांपूर्वी हवाई दलाच्या सेवेतून डकोटाने निरोप घेतला. त्याच्या विलक्षण कामगिरीला उजाळा देण्यासोबत ते जतन करण्यासाठी राज्यसभा सदस्य राजीव चंद्रशेखर यांनी भंगारात हे विमान खरेदी करून ब्रिटनमध्ये त्याची दुरुस्ती केली.
असे आहे डकोटा
डकोटा मालवाहू विमान रात्री उड्डाण करू शकत नाही. सकाळ ते सायंकाळ ही त्याच्या हवाई भ्रमंतीची वेळ. दिल्ली-बंगळुरू हवाई प्रवासात नाशिकचा थांबा घेण्यामागे ते कारण आहे. त्याच्या उड्डाणाचे निकष अतिशय कठोर आहे. खराब हवामानात ते मार्गक्रमण करू शकत नाही. यामुळे दिल्लीतील खराब हवामानामुळे त्याचे उड्डाण थांबवावे लागले. विमानाची २१ ते ३२ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. ३३३ किलोमीटर प्रतिताशी वेगाने ते मार्गक्रमण करते. साडेसात हजार किलो वजनाचा भार वाहू शकते. विमानाच्या इंधन टाकीची क्षमता ३७३६ लिटर आहे.