देशभरात लोकसभा निवडणुकांच्या निकालाची चर्चा पाहायला मिळत आहे. मतमोजणी सुरू असून काही ठिकाणी विजेत्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. याच दरम्यान नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये लढाऊ विमान कोसळलं आहे. भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानाचा अपघात झाला असून हे विमान नाशिक जिल्ह्यात कोसळले आहे.
भारतीय हवाई दलाचे एक A Su-30 MKI हे लढाऊ विमान आज महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कोसळले आहे. हे विमान ओव्हरहॉलिंगसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडे होते. विमान कोसळले तेव्हा त्यात दोन पायलट होते, या दोन्ही पायलटना बाहेर काढण्यात यश आलं आहे. ते दोघेही सुरक्षित आहेत. या प्रकरणी अधिक तपशीलांची प्रतीक्षा करत आहोत, अशी माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नाशिकमध्ये पिंपळगावातील शिरसगाव परिसरातील शेतामध्ये हे हवाई दलाचे विमान दुपारी कोसळले. विमान कोसळले, त्यावेळी शेतात कोणीच काम करत नव्हतं. दोन्ही पायलट पॅराशूटच्या सहाय्याने वेळीच विमानातून बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. विमानाचा अपघात झाल्याची माहिती मिळताच वायूदलाच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. विमानाला लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोन्ही पायलट वेळीच विमानातून बाहेर पडल्याने बचावले आहेत. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ते कोसळल्याची चर्चा होत आहे. मात्र विमान कोसळल्याच्या कारणाबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.