नाशिक : खोलवर अचूक मारा करण्याची क्षमता असणाऱ्या अतिप्रगत तोफ (ए-टॅग) प्रणालीची चाचणी अखेरच्या टप्प्यात असून वर्षअखेरीस त्या संरक्षण दलात समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ५२ किलोमीटरवर मारा करण्याची तिची क्षमता आहे. स्वदेशी बनावटीच्या धनुष तोफांच्या याच वर्षांत पाच तुकडय़ा (रेजिमेंट) तयार करण्यात येणार आहेत. जोडीला के- नऊ वज्रची संख्याही वाढविण्याची तयारी तोफखाना दलाने केली आहे.
देवळालीच्या स्कूल ऑफ आर्टिलरीच्यावतीने रविवारी आयोजित ‘तोपची’ हा वार्षिक सोहळा तोफखाना स्कूलचे कमांडंट व तोफखाना रेजिमेंटचे कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल एस. हरिमोहन अय्यर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी भारतीय बनावटीची के ९ – वज्र, धनुष, एम-९९९, सोल्टन, मॉर्टर या तोफांसह ४० रॉकेट डागणारे मल्टीबँरल रॉकेट लाँचरच्या भडिमारातून दलाची प्रहारक क्षमता अधोरेखित करण्यात आली. या प्रात्यक्षिकांचा संदर्भ देत अय्यर यांनी देशांतर्गत निर्मिलेल्या साधनसामग्रीने तोफखाना दलाच्या आधुनिकीकरणाला वेग आल्याचे अधोरेखित केले.
के – ९ वज्र आणि धनुष, देशात बांधणी झालेली एम – ९९९ (मूळ अमेरिकन) या तोफा, त्यांच्यासाठी लागणारा दारूगोळा, टेहळणी करणारे वैमानिकरहित विमान आणि शत्रूच्या आयुधांचा शोध घेणारी स्वाती रडार यंत्रणा या भारतीय उद्योगांनी निर्मिलेल्या लष्करी सामग्रीने तोफखाना दल सक्षमपणे आत्मनिर्भर होत असल्याकडे लक्ष वेधले.
नव्या तोफांनी मारक क्षमता अधिक वृिद्धगत होईल. कुठल्याही आव्हानांना तोंड देण्यास दल सज्ज असल्याचे अय्यर यांनी सांगितले. स्वदेशी अतिप्रगत तोफ प्रणाली (ए-टॅग) विशिष्ट लक्ष्य निर्धारित करून खोलवर अचूक मारा करू शकते. अधिक काळाच्या कारवाईत ती विश्वासार्ह आहे. तिच्या देखभाल दुरुस्तीचा फारसा खर्च नाही. दलाकडील बहुतांश तोफा किमान चार ते कमाल १२ टन वजनाच्या आहेत. अवजड तोफांच्या वाहतुकीसाठी लष्कराचे ताकदवान वाहन लागते. काही तोफांना तैनातीनंतर १०० ते ५०० मीटर हालचालीसाठी वाहनाने खेचावे लागते. ए टॅगला मात्र तशी गरज भासत नाही.
चित्र बदलले..
बोफोर्सनंतर प्रदीर्घ काळ नव्या तोफांची खरेदी टाळली गेली होती. त्यामुळे जुनाट तोफांवर दलास विसंबून राहावे लागले होते. हे चित्र बदलल्याचे तोपचीमधून ठळकपणे समोर आले.