जवानांच्या वेळेची व कष्टाची बचत साधणार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बर्फाच्छादित शिखरे, दऱ्या-खोऱ्यांनी वेढलेली जंगले आणि वाळवंटी प्रदेश यासारख्या सीमावर्ती क्षेत्रात अहोरात्र गस्त घालण्याचे काम करणाऱ्या लष्करी जवानांना सहाय्यभूत ठरेल, अशी दूरसंवेदन पद्धतीने नियंत्रित स्वयंचलित गस्ती यंत्रणा भारत फोर्जच्या लष्करी तज्ज्ञांनी विकसित केली आहे. या टेहेळणीमुळे जवानांच्या जिवास असणारा धोका कमी होईलच तसेच त्यांच्या वेळेची आणि क्षमतेचीही बचत होईल. टेहळणीदरम्यान घुसखोरीसारख्या काही संशयास्पद हालचाली आढळल्यास नियंत्रण कक्षातून त्यावर थेट गोळीबार करता येईल, अशीही रचना या यंत्रणेत करण्यात येत आहे.

छोटेखानी रणगाडय़ासारखी दिसणारी ‘इकार्स’ यंत्रणा बचाव मोहीम, दंगलनियंत्रण आदींसाठीही वापरता येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ही यंत्रणा सभोवतालच्या प्रत्येक बाबीचे आकलन करत मार्गक्रमण करते. विशिष्ट तंत्रामुळे ती जागेवर गोलाकार वळण घेते. एखाद्या भागाचा भौगोलिक स्थितीदर्शक नकाशा आणि टेहळणीचा मार्ग निश्चित करून दिल्यास ती स्वत:च मार्गक्रमण करते. मार्गातील सद्यस्थितीचे चित्रीकरण तत्क्षणीच नियंत्रण कक्षात पोहोचवते. ही यंत्रणा समोर येणारे अडथळे स्वत: लक्षात घेऊन आपला मार्ग बदलते.

प्रामुख्याने टेहळणीसाठी विकसित झालेल्या या यंत्रणेवर बंदूक कार्यान्वित करण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. सीमावर्ती भागात घुसखोरी वा तत्सम स्वरूपाच्या संशयास्पद हालचाली दिसल्यास नियंत्रण कक्षातून तिच्या सहाय्याने शत्रूवर गोळीबारही करता येईल. भारत फोर्जच्या संरक्षण विभागाचे प्रमुख अजय शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही यंत्रणा विकसित झाल्याचे अभियंता संदीप पाटील यांनी सांगितले.

 

‘इकार्स’ यंत्रणेची वैशिष्टय़े

* अतिशय सक्षम कॅमेरे तसेच सेन्सरनी युक्त

* चार ते पाच किलोमीटर परिघात काम करण्याची क्षमता

* ३० अंशापर्यंतची चढण चढू शकते

* डोंगर उतार असला तरी मार्गक्रमण शक्य

* उणे ४० अंश ते ४० अंशापर्यंत तापमान सोसू शकते

* कोणतेही भौगोलिक क्षेत्र व पाण्यातही कार्यरत

* १० ते १५ किमी प्रती तास वेगाने सहा तास काम करू शकते.

* जादा बॅटरी व जनरेटरचा अंतर्भाव केल्यास सलग दोन दिवस काम करण्याची क्षमता

 

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army use automatic systems for border patrol