नाशिक : इंदिरानगर पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांकडून अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ ठिकाणी सोनसाखळी चोरल्याचे उघड झाले आहे. तीन संशयितांसह विधिसंघर्षित बालकांकडून १७ लाख ५८ हजार ५२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सोने खरेदी करणाऱ्या सोनारावरही गुन्हा दाखल करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अंकोलीकर, अंमलदार सागर कोळी, जयलाल राठोड यांनी सापळा रचून सोनसाखळी चोरांना पकडले होते. त्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने संशयित परवेज मणियार आणि विधिसंघर्षित बालकाकडे चौकशी केल्यावर सोनसाखळी चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले. त्याअंतर्गत सोने, एक मोटरसायकल असा सहा लाख ९८ हजार ५२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. संशयितांनी गुन्हा करताना वापरलेला कोयताही ताब्यात घेण्यात आला.

हेही वाचा…नाशिक : पाण्यासाठी साळुंके नगराची मनपा विभागीय कार्यालयात धडक

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली मनोज ओतारी, अक्षय बोरकर आणि दोन विधिसंघर्षित (सर्व रा. शिवाजीनगर, सातपूर ) बालकांनी दिली. गुन्ह्यातील १४ तोळे, तीन मिलीग्राम सोने, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा १० लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

हेही वाचा…आश्रमशाळांमधील १२ हजार विद्यार्थ्यांना कौशल्य विकासचे धडे

अंबड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यातंर्गतचे गुन्हे मिळून एकूण परिमंडळ दोन क्षेत्रातील १४ गुन्हे उघडकीस आले. त्यात १७ लाख ५८ हजार ५२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक निरीक्षक अंकोलीकर, किरण रौंदळ, उपनिरीक्षक भूषण सोनार, उपनिरीक्षक जनकसिंग गुनावत, अंमलदार सागर परदेशी, मुश्रिफ शेख आदींच्या पथकाने केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indiranagar police uncover gold chain theft ring seize goods over 17 lakh psg