लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : अपंग विद्यार्थ्यांसाठीचे समावेशक कृती केंद्र, इंग्रजी भाषिक क्षमतेच्या विकासासाठी ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा, नीट आणि जेईई स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणासाठी ‘सुपर फिफ्टी’, जिल्ह्यातील १५ गट संसाधन केंद्रात शिक्षक- विद्यार्थ्यांसाठी राबविले जाणारे उपक्रम, ग्रामीण भागातील प्लास्टिक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी तालुकानिहाय प्लास्टिक व्यवस्थापन केंद्राची स्थापना… जिल्हा परिषदेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांनी औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी चकीत झाले. उद्योगांनी सामाजिक दायित्व निधीतून अशा उपक्रमांना बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले.
बुधवारी जिल्ह्यातील ३० औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींना जिल्हा परिषदेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती क्षेत्र भेटीतून देण्यात आली. बसमधून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यासह औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांनी प्रवास केला. भेटीची सुरुवात शासकीय कन्या शाळेपासून झाली. विद्यार्थ्यांनी निर्मिलेल्या वैज्ञानिक व शैक्षणिक प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. समावेशक कृती केंद्रात अपंग विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार मिळणाऱ्या शिक्षण सुविधांचे अवलोकन करण्यात आले.
‘सुपर फिफ्टी’ उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी सांगितले. प्रतिनिधींनी पिंपरी सय्यद ग्रामपंचायतीस भेट दिली. गावातील प्लास्टिक व्यवस्थापन केंद्राची पाहणी केली. प्रत्येक तालुक्यात असे एक केंद्र कार्यरत असल्याचे ग्रामविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी सांगितले. ग्रामपंचायतीने राबविलेल्या इतर योजनांची माहिती ग्राम पंचायत अधिकारी दौलत गांगुर्डे यांनी दिली. जिल्हा परिषदेकडून राबविण्यात येणारे उपक्रम प्रेरणादायी असल्याची भावना औद्योगिक संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. या उपक्रमांना सामाजिक दायित्व निधीतून सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.
जिल्हा परिषदेतर्फे विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रम राबविते जात आहेत. या उपक्रमांत उद्योग सामाजिक दायित्व निधीतून थेट निधी देऊन सहभाग नोंदवू शकतात. -आशिमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)