जळगाव – महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरतर्फे गुरुवारी जिल्हा विकास परिषद होणार आहे. परिषदेत विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. जिल्ह्यातील व्यापार-उद्योगाच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर्सचे अध्यक्ष ललित गांधी, प्रकल्पप्रमुख संगीता पाटील यांनी दिली.
हेही वाचा >>> धुळे : अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रासाठी धुळ्यात मोर्चा
राज्य शासनाचा उद्योग विभाग, एमएसएमई, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योग संचालनालयातर्फे शहरातील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात दुपारी तीन ते सायंकाळी सात या वेळेत ही परिषद होणार आहे. परिषदेला उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र कुशवाह, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, जिल्हाधिकारी अमन मित्तल, महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, जैन इरिगेशनचे कार्यकारी संचालक अतुल जैन यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहणार आहे. परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन नितीन इंगळे, पुरुषोत्तम टावरी, दिलीप गांधी यांनी केले आहे. दरम्यान, अनेक वर्षांपासून अनिर्णीत गाळेप्रश्नासह बाजार समितीबाहेर आकारले जाणारे मार्केट शुल्क, विमानसेवा सुरू करणे, रेल्वेगाड्यांना थांबा व रस्ते हे प्रश्न मांडावेत, असा निर्णय व्यापारी असोसिएशन महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण पगारिया, युसूफ मकरा, पुरुषोत्तम टावरी, दिलीप गांधी, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या संगीता पाटील आदींची उपस्थिती होती.