लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: नवजात शिशुसाठी आईचे दूध हे अमृत ठरते. बालकांच्या आरोग्यासाठी आईच्या दुधात पोषणमूल्य असतांना बऱ्याचदा या संजीवनीपासून बालकांना मुकावे लागते. अशा नवजात शिशुंना आईचे दूध मिळावे, यासाठी नाशिक जिल्हा रुग्णालय तसेच रोटरी क्लब ऑफ नाशिक, नाशिक रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने रुग्णालयाच्या आवारात दूध पेढी सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत या पतपेढीसाठी दूध संकलनाचे आव्हान जिल्हा रुग्णालयासमोर उभे आहे.
नवजात बालकांसाठी जीवनवाहिनी ठरणारे आईचे पहिल्या सहा महिन्यातील दूध काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी कमी पडत आहे. बाळाच्या जन्मावेळी मातेचा मृत्यू होणे, अपूर्ण दिवसांची बालके, काही गुंतागुंतीमुळे आईचे दूध कमी मिळणे, अशी अनेक कारणे असू शकतात. यावर एकमेव उपाय म्हणजे इतर मातांचे पाश्चराईज केलेले दूध अर्भकाला उपलब्ध करून दिले तर नवजात शिशुचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. परंतु, हे दूध सहजासहजी उपलब्ध होईल, असे नाही. यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत दूध संकलन करण्यात येत आहे.
हेही वाचा… शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी नियोजन करावे; धुळे जिल्हाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांना सूचना
नाशिक जिल्ह्यात रोटरीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ सदस्य आणि अध्यक्षस्थानी एक डॉक्टर अशी मातेच्या दुधाची दूधपेढी रोटरी क्लब ऑफ नाशिकने जिल्हा रुग्णालयात तयार केली. परंतु, काही तांत्रिक अडचणींमुळे १५ दिवसातच ही दूधपेढी बंद पडली.
सातत्याने होणाऱ्या पाठपुराव्यामुळे अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करुन दूधपेढी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्हा शासकीय रुग्णालयात मातांचे समुपदेशन करुन दूध संकलन केले जात आहे. दिवसभरात केवळ दोन ते अडीच लिटर दूध संकलित होत असल्याची माहिती पेढीचे समन्वयक डॉ. पंकज गाजरे यांनी दिली. नवजात मातांना रोज अर्धा तास समुपदेशन केले जाते. महिलांची मानसिकता नसल्याने दूध संकलनात अडचणी येतात. खासगी रुग्णालयाच्या वतीनेही मातेच्या दुधाची मागणी होत आहे. खासगी रुग्णालयाकडून नवजात मातांचे समुपदेशन झाल्यास दूध संकलनात मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.