नाशिक स्मार्ट सिटीच्या कार्यशाळेतील सूर
नाशिक : नाशिककरांमध्ये सायकलचा वाढता वापर लक्षात घेता त्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचा सूर ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’च्या अनुषंगाने नाशिक स्मार्ट सिटीच्या वतीने आयोजित कार्यशाळेतून उमटला.
स्मार्ट सिटी मिशन, गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालय, केंद्र सरकार यांच्या सहकार्याने ‘इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज’ उपक्रमासंदर्भात नाशिक स्मार्ट सिटीने शहरातील सायकल संघटना, क्रेडाई, आयमा, निमा, इंजिनीअर्स असोसिएशन, नाशिक फर्स्ट, नाशिक सायकलिस्ट्स असोसिएशन, नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशन, महाविद्यालयांचे प्रमुख तसेच प्रतिनिधी यांच्यासोबत गुरुवारी वेबिनार घेतला. महानगरपालिका आणि नाशिक स्मार्ट सिटी यांच्या माध्यमातून इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
नाशिकमध्ये कामगार वर्ग आणि हौशी मंडळी मोठय़ा प्रमाणावर सायकल चालवतात. त्यामुळे शहरात तशा सुविधा करण्याच्या दृष्टीनेही सूचना मांडण्यात आल्या. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंजबाबत थोडक्यात माहिती दिली.
नाशिक शहराला सायकलस्नेही करण्यासाठी विविध संस्था, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांची साथ गरजेची असल्याचे सांगितले. त्र्यंबक नाका ते पपया नर्सरी हा एकूण १३ किलोमीटरचा पॉप अप सायकलमार्ग प्रस्तावित असल्याचे या वेळी स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक निखिल भोईर यांनी सांगितले.
कामगार वर्गाचा विचार करता तात्पुरती सायकल मार्गिका पुढे औद्योगिक वसाहतीत नेण्याची गरज निमाचे अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी मांडली. सायकलिंगसाठी सिडकोला अंबड आणि सातपूर औद्योगिक वसाहतीशी जोडणे गरजेचे असून कंपन्यांपर्यंत सायकलमार्गिका नेल्यास त्याचा कामगारांना मोठय़ा प्रमाणात फायदा होईल, असे त्यांनी मांडले.
नाशिकमध्ये सायकलप्रेमींची संख्या मोठी असून त्यादृष्टीने लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी निमा, आयमा संघटना सर्वेक्षण आणि सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी नमूद के ले. डॉ. विलास पाटील, डॉ. ढाके यांनी भविष्याचा विचार करून त्याप्रमाणे सायकलिंगच्या दृष्टीने शहरातील विविध भागांमध्ये तात्पुरती सायकलमार्गिका, स्लो झोन अशा सुविधा देण्याच्या सूचना केल्या.सायकल्स फॉर चेंज चॅलेंजअंतर्गत पहिल्या ११ शहरांमध्ये येण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. त्यात सायकल चालविण्याविषयी प्रबोधन, मुक्त फेरी, समाजमाध्यमातून प्रसिद्धी करण्यात येत आहे. तसेच पॉप अप ट्रॅकदरम्यान सायकलपटूंना कोणत्या अडचणी येतात, याविषयी माहिती घेण्यात आली.
शहर परिसरात तात्पुरत्या सायकल मार्गिके साठी प्रयत्न
कमीत कमी खर्चात तात्पुरती सायकल मार्गिका उभारण्यात येणार आहे. वाहनरहित मार्गिका बनविण्यात येणार असून एखाद्या मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी ठेवावी लागेल. फक्त सायकल वापरास परवानगी द्यावी लागेल. या पथदर्शी प्रकल्पात सायकल जनजागृती आणि सायकल दर योजना राबविण्यात येणार असून यासाठी नागरिक आणि सामाजिक संस्थेची मदत घेण्यात येणार आहे.