लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: जनावरांपासून जादा दूध उत्पादन मिळण्यासाठी ऑक्सिटोसीन या औषधाची मात्रा दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार म्हसरूळ परिसरातील आनंद डेअरी फार्ममध्ये उघड झाला. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून बेकायदेशीर औषधांचा साठा जप्त केला. या प्रकरणी गोठा मालकाविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-नाशिक जिल्ह्यात एक लाखाहून अधिक कुणबी नोंदींचा शोध, आतापर्यंत ८४ लाख नोंदींची पडताळणी
याबाबत औषध निरीक्षक प्रवीण हारक यांनी तक्रार दिली. आनंद वर्मा (आनंद डेअरी फार्म, जकात नाक्याजवळ दिंडोरी रस्ता, म्हसरूळ) असे संशयित गोठा मालकाचे नाव आहे. आनंद डेअरी फार्ममध्ये गाई, म्हशींना दूध वाढविण्यासाठी ऑक्सिटोसीन नावाचे औषध दिले जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्या आधारे पथकाने छापा टाकला असता बंदी असतानाही या औषधाचा बेकायदेशीरपणे वापर होत असल्याने निदर्शनास आले. गोठ्यात मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असलेल्या वेष्टनरहित भेसळयुक्त औषधी घटक द्रवाचा साठा मिळून आला. जनावरांचे दूध वाढविण्यासाठी त्यांना या औषधाची मात्रा दिली जात असल्याचे निष्पन्न झाले. या औषधांचा पुरवठा कुठून होत आहे, याची छाननी अन्न व औषध प्रशासनाकडून केली जात आहे.