नाशिक – अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे नवी दिल्ली येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनबरोबर सामंजस्य करार करत ”गुरूशाला” हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे शासकीय आश्रमशाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची गोडी निर्माण होऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढीस मदत होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात आदिवासी विकास विभागामार्फत ४९७ शासकीय आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांमध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांचे अध्ययनस्तर, मूल्यमापन आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने विविध उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी ”गुरूशाला” उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रथम एज्युकेशन फाउंडेशनबरोबर तीन वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> परीक्षा अर्ज भरताना अडवणूक केल्यास शाळांवर कारवाई;  शिक्षण मंडळाचा इशारा

गुरूशाला उपक्रमांतर्गत २०२४-२०२५ ते २०२६-२०२७ या शैक्षणिक वर्षात प्रथम एज्युकेशन फाउंडेशनकडून आश्रमशाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि अधीक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा उपक्रम तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांचे मूल्यांकन, दुसऱ्या टप्प्यात शिक्षक-शिक्षिका यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण तर तिसऱ्या टप्प्यात अधीक्षक-अधीक्षिका यांना क्षमता बांधणी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

आदर्श शाळा स्पर्धेत ४९७ प्रकल्पांचे सादरीकरण

गुरूशाला उपक्रमांतर्गत आश्रमशाळा शिक्षकांना प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श शाळा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ४९७ प्रकल्पांचे सादरीकरण झाले. त्यापैकी २८७ प्रकल्प पुढील टप्प्यासाठी पात्र ठरले. त्यात नाशिक अपर आयुक्तालयाच्या १००, ठाणे आयुक्तालयाच्या ९१, नागपूर आयुक्तालयाच्या ५६ तर अमरावती आयुक्तालयाच्या ४० प्रकल्पांचा समावेश आहे.

गुरूशाला प्रकल्पामुळे शिक्षकांच्या अध्यापन तर विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत गतिमानता येईल. अध्ययन सुलभ होऊन पायाभूत क्षमतांचा विकास होईल. परिणामी, आश्रमशाळांचा शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावेल. – नयना गुंडे (आयुक्त, आदिवासी विकास विभाग)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Innovative initiative gurushala launched by tribal development department zws