आदिवासी विकास प्रकल्प विभागातंर्गत सहा तालुक्यातील दोन हजार विद्यार्थी शैक्षणिक सुविधांपासून अजूनही वंचित असल्याचे उघड झाल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी या विभागातील संबंधितांना चांगलेच फटकारले. लोकाभिमुख कामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण येथे विविध कामांसंदर्भात डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय विभागांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांत विशाल नरवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, आदिवासी उपायुक्त संदिप गोलाईत, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी दीपक पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणवीर आदी उपस्थित होते.
कळवण प्रकल्प कार्यालय अंतर्गत सुरगाणा, कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, नांदगाव या सहा तालुक्यातील १९ हजारपैकी १७ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. परंतु, यापैकी दोन हजार विद्यार्थ्यांना अद्याप मिळाली नसल्याचे आढावा बैठकीत उघड झाले. यावरून डॉ. पवार यांनी संबंधितांची झाडाझडती घेत यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला. निधी उपलब्ध असूनही दोन हजार मुलांना शिष्यवृत्ती का मिळाली नाही, त्याचे उत्तर अहवाल सादर करून देण्यास त्यांनी सांगितले. शिष्यवृतीचे सहा लाख रुपये आणि त्यावर मिळणारे व्याज तसेच पडून असल्याने वंचित मुलांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी प्रांत, जिल्हाधिकारी यांनी देखील लक्ष घालावे, अशी सूचना त्यांनी केली. सामुदायिक विवाह सोहळ्यातील बहुतांश जोडप्यांना अजूनही शासकीय योजनांचा लाभ मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. घरकुलाच्या खऱ्या लाभार्थींनाच सदर योजनेचा लाभ देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा >>>नंदुरबार: मार्चनंतरही कोषागारात कोट्यवधींची देयके प्रलंबित; अनेक शासकीय कार्यालयांचे आर्थिक व्यवहार ठप्प

आढावा बैठक सुरू होताच डॉ. पवार यांनी आरोग्य विभागाचा विषय चर्चेला घेतला. गरोदर मातांच्या प्रसुतीची कामे आतापर्यंत किती डॉक्टरांनी केली आहेत, किती डॉक्टरांनी केली नाहीत. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी केव्हा येतात, असे प्रश्न उपस्थित करीत काही अडचणी असल्यास सविस्तर माहिती देण्यास डॉ.पवार यांनी सांगितले. आंबाठा, उंबरठाण, आंबूपाडा, कुकूडणे आदी उपकेंद्रातील अडचणी नागरिकांनी मांडल्या. आयुषमान भारत योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण भागात मिळाला नसल्याचे सांगण्यात आले. गरोदर मातांना वणी येथे सोनोग्राफीसाठी जावे लागते. परंतु, कंत्राट संपल्याने सोनोग्राफी करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचीही दखल डॉ.पवार यांनी घेतली. तालुक्यात केवळ सुरगाणा, उंबरठाण, पळसन या तीन ठिकाणी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा आहे. बाऱ्हे, उंबरठाण या ठिकाणी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा सुरु करण्याची मागणी करण्यात आल्याने डॉ.पवार यांनी दखल घेतली.

तालुक्यातील ६६ वाड्या-पाड्यांवर अद्यापही वीज पोहचलेली नाही. याबाबत लक्ष घालण्याचे आश्वासन पवार यांनी दिले. या आढावा बैठकीत नागरिकांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले. नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीरपणे दखल घेऊन कामे करावीत, अशी सूचना पवार यांनी केली.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspection of tribal development project by dr bharti pawar amy
Show comments