नाशिक – नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची व्याप्ती लक्षात घेता भाविक, प्रशासकीय कामासाठी येणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी निवास व्यवस्था तसेच अन्य कामासाठी मोठ्या प्रमाणात जागेची आवश्यकता लागणार आहे. त्यामुळे सर्व शासकीय आस्थापनांनी भू बँक (लँड बँक) तयार करण्याची सूचना विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत गेडाम यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह विविध आस्थापनांचे अधिकारी उपस्थित होते. गेडाम यांनी, कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागा लागणार असल्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. साधारणत: एक हजार एकरपेक्षा अधिक जागा अपेक्षित आहे. महापालिका, जिल्हा परिषद, त्र्यंबक नगरपालिका यासह सर्व शासकीय आस्थापनांनी कुंभमेळ्यासाठी येणारे भाविक, कर्मचारी यांच्या निवास व्यवस्थेसाठी जागांचा शोध घेणे गरजेचे आहे.
यासाठी भू बँक तयार करावी, असे त्यांनी सांगितले. उपग्रह प्रणालीव्दारे कुठे जागा उपलब्ध आहे, हे लक्षात येईल. त्यानुसार गर्दीचे नियोजन करता येईल, असे गेडाम यांनी नमूद केले. प्रयागराज कुंभमेळ्यात प्रशासकीय नियोजनापेक्षा जास्त गर्दी झाली. हे नाशिक येथील कुंभमेळ्यातही होऊ शकते. या अनुषंगाने साधुग्रामसाठी आरक्षित जागेव्यतिरिक्त भाडेतत्वावर जागा मिळते का, हे पाहण्यात येत आहे.
कुंभमेळ्यासाठी होणारी गर्दी पाहता वाहनांनी शहरात प्रवेश करु नये, यासाठी वाहनतळ निश्चिती करण्यात येत आहे. नाशिक महानगरपालिका, स्मार्ट सिटी, त्र्यंबक नगरपालिका यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी तीन ते चार हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मागणी केली आहे. पोलिसांकडून २० हजार कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय अन्य काही मुद्यांवर बैठकीत चर्चा झाली.