नाशिक – जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र तसेच सीपीआर आणि जिल्हा रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांवर त्वरीत उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
वाढत्या तापमानामुळे नागरिकांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कामानिमित्त बाहेर फिरणारे, उन्हात शेतात काम करणारे मजूर, कामगार यांना उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. उन्हामुळे मळमळ, उलटी, थकवा, चक्कर येणे, डोकेदुखी अशा तक्रारी सुरू होतात. मानसिक स्थिती बिघडते. व्यक्ती असंबंध बडबड करते. चिडचिड होऊ लागते. जीभ जड होते. जास्त घाम येतो, पायात गोळे येतात. या अनुषंगाने आरोग्य विभागाच्या वतीने सूचना करण्यात आल्या आहेत.
उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून दर तासाला एक ते १.५ ग्लास पाणी प्यावे, लिंबू सरबत, शहाळे, फळांचा ताजा रस, पन्हे, कोकम सरबत, ताक, लस्सी असे द्रवपदार्थ घ्यावेत. आराम करावा, सैलसर, पातळ, फिकट रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करावेत. उष्माघात टाळण्यासाठी गरज नसेल तर उन्हात फिरू नये. बाहेर जाताना गॉगल, टोपी, रुमाल, छत्री अथवा सनकोट असावा. बाहेर जाणे गरजेचे असल्यास उन्हापासून संरक्षण होईल, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी केले आहे.
उष्माघात झाल्यास काय करावे ?
उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यास प्रथम भरपूर पाणी प्यावे. उन्हातून आल्यानंतर थोडावेळ बसावे. आणि नंतर पाणी प्यावे. खूप थंड, बर्फ टाकलेले पाणी पिऊ नये. डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. उष्माघाताचा त्रास जाणवू लागल्यास वैद्यकीय सल्ल्यासाठी किंवा निदानासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. लहान मुले, ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी.