लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक : महापालिका निवडणूक महायुतीत लढली जाईल की स्वतंत्रपणे, याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. परंतु, शिवसैनिकांनी प्रत्येक प्रभागात सक्रिय होऊन सामान्यांचे प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्यावे, असा कानमंत्र शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या बैठकीत देण्यात आला.
शहरातील शिंदे गटाच्या अंगीकृत संघटनांची बैठक पक्ष कार्यालयात पार पडली. आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या तयारीवर मंथन झाले. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता नाशिक महापालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे आणि जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्याकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन उपनेते विजय करंजकर आणि महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी केले.
आणखी वाचा-आता खुप झाला, पुरुषांवर अत्याचार…
प्रत्येक प्रभागात मतदार नोंदणी मोहीम राबवावी. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी अग्रेसर रहावे, असे तिदमे यांनी सूचित केले. लवकरच शिवसेना सदस्य नोंदणी अभियान सुरु करणार आहे. केवळ उमेदवारीसाठी नका तर, पक्ष बांधणीसाठी काम करा, असेही सूचित करण्यात आले. महायुती सरकारने राबविलेल्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे सांगण्यात आले.