लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : प्रचंड उकाडा आणि अधूनमधून अवकाळी पावसाची हजेरी अनुभवणाऱ्या जिल्ह्यात मेच्या मध्यावर पाणी टंचाईचे संकट गडद झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सर्वत्र धुरळा उडाला असताना १२ तालुक्यांतील लाखो मतदारांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत ३१५ गावे आणि ८२४ वाडी अशा एकूण ११३९ गाव-वाड्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. जवळपास सहा लाख लोकांना ३५० टँकर वा खासगी विहिरीतून पाणी पुरविले जात आहे.

एप्रिलमध्ये तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडला होता. महिनाभर कमालीचा उकाडा सहन करताना अनेक भागात पाणी टंचाईच्या तीव्र संकटाला तोंड द्यावे लागत आहे. नाशिक, दिंडोरीसह धुळे लोकसभा मतदार संघात २० मे रोजी मतदान होणार आहे. सध्या शहर आणि ग्रामीण भागात राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. यात पाणी टंचाईचा विषय हरवल्याचे चित्र आहे. टंचाईग्रस्त गावांची संख्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात वाढली. जिल्हा परिषदेच्या अहवालानुसार सध्या ३१५ गावे आणि ८२४ वाड्या अशा एकूण ११३९ ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. धरणांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरीतील आठ गावे आणि २५ वाड्यांनाही टँकरने पाणी द्यावे लागत आहे. आजवर टंचाईपासून दूर राहिलेल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातही टँकर सुरू करण्यात आले. १२ तालुक्यातील पाच लाख ९९ हजार ३६ नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत.

आणखी वाचा-नाशिक: आरोग्य विद्यापीठात बिबट्या जेरबंद

प्रशासनाच्या अहवालानुसार नांदगाव तालुक्यात ६४ गावे व २७६ वाडी अशा एकूण ३४० गाव-वाड्यांना ६९ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. मालेगाव तालुक्यात १२७ गाव-वाडे (४६ टँकर), येवला तालुक्यात ११८ (५६ टँकर), बागलाण ४६ (४१), चांदवड १०० (३१), देवळा ६२ (३३), इगतपुरी ३३ (सात), सुरगाणा २८ (१४), सिन्नर २५६ (४०), पेठ १६ (११), नाशिक व त्र्यंबकेश्वर या तालुक्यात प्रत्येकी एका गावात ( प्रत्येकी एक) असे टँकर सुरू आहेत. निफाड आणि दिंडोरी तालुक्यात अद्याप टँँकरची गरज भासलेली नाही. दिंडोरीतील दोन टंचाईग्रस्त गावांची आणि कळवण तालुक्यात १९ गाव-वाड्यांची तहान भागवण्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करावे लागले आहे. जिल्ह्यात ३५० टँकरमार्फत दैनंदिन ७४० फेऱ्या केल्या जात आहेत. टँकरची व्यवस्था न झालेल्या भागात महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.

१९१ विहिरींचे अधिग्रहण

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाला खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात गावांसाठी ४९ तर, टँकरसाठी १३६ अशा एकूण १९१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. बागलाण, मालेगाव तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी ५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. चांदवडमध्ये पाच, देवळा ३५, मालेगाव ५१, कळवण १९, नांदगाव १०, येवला तालुक्यात सहा, सुुरगाणा सात, दिंडोरी तालुक्यात दोन विहिरी अधिग्रहीत केल्या आहेत. सध्या केवळ निफाड आणि दिंडोरी हे दोन तालुके वगळता सर्वत्र टँकर सुरू आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intensity of water shortages in nashik dark 1139 villages and wadis in 12 talukas are supplied with water by tanker mrj