लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
नाशिक: महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या सुरक्षा ठेवीच्या रकमेवरील व्याजापोटी २०२२-२३ मध्ये नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळातील २३ लाख ८५ हजार १०८ ग्राहकांना व्याजाच्या रुपाने १७ कोटी ४३ लाख २६ हजार रुपयांचा परतावा त्यांच्या मागील दोन महिन्यातील वीज देयकातून समायोजित करण्यात आला आहे.
वीज कायद्यानुसार सुरक्षा ठेव भरणे वीज ग्राहकांसाठी बंधनकारक असून, ग्राहकांचा वार्षिक वीज वापर लक्षात घेऊन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. दरवर्षी त्याची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीज वापरानुसार नव्याने निर्धारीत केलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र देयक देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका देयकाच्या रकमेइतकी होती. आता वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक देयक असेल तर तेथे सरासरी मासिक देयकाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक देयकाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे.
आणखी वाचा-नाशिक शहरात अपघातप्रवण क्षेत्रातील धोके कायम
ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीज देयकाद्वारे समायोजित करून दिली जाते. त्यानुसार २०२२-२३ मध्ये नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक, मालेगाव व अहमदनगर मंडळातील २३ लाख ८५ हजार १०८ ग्राहकांना १७ कोटी ४३ लाख २६ हजार रुपयांच्या व्याजाचा परतावा मागील दोन महिन्यांच्या वीज देयकांच्या माध्यमातून समायोजित करण्यात आला आहे.
सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी चांदवड विभागातील एक लाख ६२ हजार ९१७ ग्राहकांना ८६ लाख ४७ हजार, नाशिक ग्रामीण विभागातील दोन लाख ४३ हजार ३३४ ग्राहकांना एक कोटी ७७ लाख १४ हजार, नाशिक शहर एक विभागातील दोन लाख १८ हजार ४०६ ग्राहकांना दोन कोटी ५४ लाख ९३ हजार, नाशिक शहर दोन विभागातील चार लाख ५० हजार ४८६ ग्राहकांना तीन कोटी सहा लाख ३७ हजार रुपयांचा परतावा समायोजित करण्यात आला आहे. कळवण विभागातील ७७ हजार ४८४ ग्राहकांना ४६ लाख ४३ हजार, मालेगाव विभागातील ७९ हजार १५६ ग्राहकांना ४१ लाख ७६ हजार, मनमाड विभागातील एक लाख २५ हजार ७४४ ग्राहकांना ६९ लाख ८२ हजार, सटाणा विभागातील ७६ हजार ३१५ ग्राहकांना ४१ लाख ४३ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. अशी एकूण नाशिक जिल्ह्यात १४ लाख ३३ हजार ८४२ ग्राहकांना १० कोटी २४ लाख ३६ हजार रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. अहमदनगर मंडळात नऊ लाख ५१ हजार २६६ ग्राहकांना सात कोटी १८ लाख ८९ हजार रुपयांचा परतावा समायोजित करण्यात आला आहे.