त्रुटी दूर करण्याची मागणी

शहराचे सांस्कृतिक प्रतिबिंब असलेले महाकवी कालिदास कलामंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर महिन्यापूर्वी रसिकांसाठी खुले झाले. परंतु, अल्पावधीतच कलामंदिरातील अंतर्गत त्रुटी उजेडात आल्या असून त्याचे हाल होण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे.

नुतनीकरणानंतर नाशिककरांची उत्सुकता जास्त न ताणता भाडेवाढीच्या मुद्यावरून सुरू असलेल्या संघर्षांकडे दुर्लक्ष करून स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपरेरेशन आणि महापालिकेने कलामंदिर महिन्यापूर्वी रसिकांना खुले केले. प्रदीर्घ कालावधीनंतर कलामंदिर खुले झाल्याने प्रायोगिक नाटकांसह, वेगवेगळ्या संस्थांचे काही कार्यक्रम कलामंदिरात आयोजित होण्यास सुरुवात झाली आहे. प्रशांत दामले यांचे बहुचर्चित ‘साखर खाल्लेला माणूस’ नाटक कलामंदिरात झाले, तेव्हां अनेकांनी नाटक तसेच कलामंदिरचे नवे रूप पाहण्यासाठी गर्दी केली. यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांचा पुरस्कार वितरण सोहळा, सभेसह काही शासकीय कार्यक्रमही या ठिकाणी झाले. बोटावर मोजता येतील इतकेच कार्यक्रम कलामंदिरात झाले असतांना कलामंदिराच्या दुरवस्थेस पुन्हा सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे.

कलामंदिरात झालेल्या पहिल्याच कार्यक्रमात विद्युत दाबामुळे काही वायर जळाल्या. या वायर तांब्याऐवजी अ‍ॅल्युमिनियमच्या टाकल्याने आठ ते दहा तासांपेक्षा जास्त वेळ काम सुरू राहिल्यास त्या तापतात आणि जळाल्याचा वास येण्यास सुरुवात होते. तसेच, कलामंदिराच्या मुख्य काचेच्या प्रवेशद्वारावरील एक कडी गायब झाली आहे. नव्याने बसविण्यात आलेल्या खुच्र्याचे हात सैल होऊ लागले आहेत.

दुसरीकडे, अत्याधुनिक प्रकाश व्यवस्थेचा बोलबाला स्मार्ट सिटीकडून होत असला तरी प्रकाशयोजनेवर रंगकर्मीकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कंपनीने प्रकाश व्यवस्था एक हजार व्हॅटची सांगितली. नाटय़क्षेत्रातील तंत्रज्ञांनी त्याची तपासणी केली असता ती केवळ  ७५० व्हॅटची निघाली. रंगमंचाचा एक ठराविक परिसर या माध्यमातून प्रकाशाने व्यापला  जात नाही. नव्याने केलेल्या प्रकाशयोजनेत संपूर्ण रंगमंचावर प्रकाश पडतो. त्यात काही बदल करता येत नाही, अशी रंगकर्मीची तक्रार आहे. तसेच कलामंदिराच्या देखभालीसाठी आवश्यक असणारे पुरेसे मनुष्यबळ आजही उपलब्ध नाही. या सर्वाचा परिणाम कलामंदिराच्या देखभालीवर होत आहे. या सर्व त्रुटी लवकरात लवकर दूर व्हाव्यात, अशी मागणी रंगप्रेमीकडून केली जात आहे.

शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना कलामंदिर देण्यास विरोध

कलामंदिराच्या नूतनीकरणानंतर सुरुवातीपासूनच कलामंदिर शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांना देऊ नये, अशी मागणी करणारा एक गट आहे. कलामंदिराऐवजी शाळांसाठी दादासाहेब गायकवाड सभागृह देण्यात यावे. स्नेहसंमेलन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाला आसन क्षमतेपेक्षा जास्त गर्दी होते. लहान मुले कोठेही कसेही फिरतात, सामानाशी खेळतात. त्यांच्या सोबत आलेले पालकही बेजबाबदारपणे वागत घरून आलेले खाद्यपदार्थ, बाहेरून आणलेले पदार्थ, सामान तेथेच टाकतात. विरोध डावलत कलामंदिर शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना खुले करण्यात आले आहे. यामुळे पुढील काही वर्षांत पुन्हा नव्याने नऊ कोटी तयार ठेवा, असा खोचक सल्ला या गटाने दिला आहे.