लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : या वर्षापासून देशातील पहिला आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव मुंबई किंवा पुणे येथे आयोजित केला जाईल, अशी घोषणा उद्योगमंत्री तथा नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी केली.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे गुरुवारी आयोजित पुरस्कार प्रदान सोहळा सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. जब्बार पटेल यांनी महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव महाराष्ट्रात झाला पाहिजे, अशी मागणी चर्चेत केली होती. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्यावतीने त्याचे आयोजन व्हायला हवे, ही त्यांची अपेक्षा मान्य करण्यात आली.

आणखी वाचा-वाढत्या मागणीमुळे जंगलातील सफेद मुसळीच्या प्रमाणात घट

आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव पाच की सात दिवसीय तसेच अन्य बाबी निश्चित करण्यासाठी लवकरच समिती जाहीर केली जाईल. या माध्यमातून देशात पहिल्यांदा महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवास सुरुवात होईल, असे सामंत यांनी सांगितले. लोककला जपण्यासाठी १५ ते २५ वयोगटातील युवक तुतारी वाजविण्याचा व्यवसाय करतात. त्यांचे निश्चितपणे कौतुक आहे. तथापि, लोककला जपत असताना त्यांनी केवळ तुतारी वाजवावी, प्रचार करू नये असा सल्ला सामंत यांनी दिला.

डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यातील दुर्घटनेनंतर धोकादायक कारखान्यांची अ, ब आणि क गटात वर्गवारी करण्यात आली आहे. आचारसंहिता संपताच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. शुक्रवारी सादर होणारा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या हिताचा, महिलांच्या संरक्षणाचा, युवकांच्या उद्धाराचा व शेतकऱ्यांना ताकद देणारा असेल याबद्दल त्यांनी विश्वास व्यक्त केला.