जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी संस्थेच्या ताब्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये भोईटे गटाकडून अॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून धमकावल्याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाकडून केला जात असून, पथक चार दिवसांपासून संशयितांचे जबाब नोंदवित आहेत. पथकाने भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर यांचा जबाब घेतला.
जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेचा ताबा मिळविण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये भोईटे गटाकडून अॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून धमकाविल्याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल होता. चार दिवसांपासून शहरात तळ ठोकून असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाने सुनील झंवर यांच्यासह जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्या राजकीय पदाधिकार्यांची चौकशी करीत जबाब नोंदविले. तसेच झंवर यांनी काही ध्वनिफितींसह पुराव्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे पथकाकडे सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अॅड. पाटील यांना पुण्यात ज्या सदनिकेत डांबून ठेवण्यात आले होते, ती सुनील झंवर यांची असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्याअनुषंगाने जबाब नोंदविण्यासाठी झंवर यांंना बोलाविण्यात आले होते.
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाने शहरातील नूतन मराठा महाविद्यालयातील संस्थेच्या कार्यालयात चौकशीही केली. तेथे तत्कालीन संचालकांनी केलेल्या ठरावांची कागदपत्रेही तपासली. या गुन्ह्यातील संशयित जयवंत भोईटे यांनी अंतरिम जामिनासाठी दहा फेब्रुवारी रोजी दाखल केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.