जिल्हा मराठा विद्याप्रसारक सहकारी संस्थेच्या ताब्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये भोईटे गटाकडून अ‍ॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून धमकावल्याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाकडून केला जात असून, पथक चार दिवसांपासून संशयितांचे जबाब नोंदवित आहेत. पथकाने भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर यांचा जबाब घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेचा ताबा मिळविण्यासाठी जानेवारी २०१८ मध्ये भोईटे गटाकडून अ‍ॅड. विजय पाटील यांना पुण्यात बोलावून धमकाविल्याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल होता. चार दिवसांपासून शहरात तळ ठोकून असलेल्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाने सुनील झंवर यांच्यासह जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्या राजकीय पदाधिकार्‍यांची चौकशी करीत जबाब नोंदविले. तसेच झंवर यांनी काही ध्वनिफितींसह पुराव्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रे पथकाकडे सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अ‍ॅड. पाटील यांना पुण्यात ज्या सदनिकेत डांबून ठेवण्यात आले होते, ती सुनील झंवर यांची असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्याअनुषंगाने जबाब नोंदविण्यासाठी झंवर यांंना बोलाविण्यात आले होते.

हेही वाचा – डॉक्टर-रुग्णांमध्ये सुसंवादाची गरज ; आरोग्य विद्यापीठ दीक्षांत सोहळ्यात गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

हेही वाचा – राज्यात २५ हजार उद्योजक घडविणार ; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन, औद्योगिक वसाहतीत २७ प्रकल्पांचे भूमिपूजन

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पथकाने शहरातील नूतन मराठा महाविद्यालयातील संस्थेच्या कार्यालयात चौकशीही केली. तेथे तत्कालीन संचालकांनी केलेल्या ठरावांची कागदपत्रेही तपासली. या गुन्ह्यातील संशयित जयवंत भोईटे यांनी अंतरिम जामिनासाठी दहा फेब्रुवारी रोजी दाखल केलेला अर्जही न्यायालयाने फेटाळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interrogation of sunil zanwar by central bureau of investigation team ssb