‘कर्मभूमी मार्केटिंग’च्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा * कर्जमुक्तीचे स्वप्न ठरले मृगजळ
नाशिक : अल्प गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवत कर्मभूमी मार्केटिंग तथा कर्जमुक्ती कंपनीने शहरातील अनेक गुंतवणूकदारांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी मैत्रेय, केबीसी अशा वेगवेगळ्या कंपन्यांच्या घोटाळ्यांमध्ये हजारो नागरिकांचे हात पोळले गेले आहेत. तरीही नागरिक पैसे गुंतविताना विचार करत नाही. अवघ्या तीन ते सहा महिन्यांत गुंतवणुकीवर जादा परताव्याला अनेक जण भुलले. या ऑनलाइन घोटाळ्य़ात शहरातून मोठय़ा प्रमाणात गुंतवणूक झाल्याची शक्यता आहे. कंपनीच्या संचालकांनी गाशा गुंडाळल्याने हा प्रकार समोर आला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात नऊ जणांविरुद्ध फसवणूक आणि एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत संभाजी चौकात वास्तव्यास असणारे किशोर पाटील यांनी तक्रार दिली. शरद चव्हाण, दीपक चव्हाण, छाया चव्हाण, मंगलाबाई चव्हाण, प्राची चव्हाण, माई चव्हाण, बंटी पाटील, सचिन गुरव आणि संजय उपाध्याय अशी संशयितांची नावे आहेत. गंगापूर रस्त्यावरील दत्त चौकात संशयितांनी कर्मभूमी मार्केटिंग प्रा. लि. आणि कर्जमुक्ती कंपनी नावाने कार्यालय थाटले होते. ऑनलाइन गुंतवणूकदारांना आपल्या जाळ्य़ात ओढण्यासाठी संशयितांनी संकेतस्थळाच्या माध्यमातून कंपनी आणि गुंतवणूक योजनेचा प्रचार, प्रसार केला. योजनेत १३ हजार रुपये गुंतवा आणि तीन ते सहा महिन्यात तब्बल दीड लाख रुपये कमवा असे आमिष दाखविले गेल्याने गुंतवणूकदार पाटील यांनी संशयिताच्या कार्यालयात जाऊन गुंतवणुकीबाबत माहिती घेतली. तेव्हा त्यांना ऑनलाईन गुंतवणुकीचा सल्ला दिला गेला. गुंतवणूक सुरक्षित राहील असा सल्ला दिला गेल्याने पाटील यांनी तीन ऑगस्ट २०१८ रोजी एक लाख ९५ हजाराची गुंतवणूक केली. हे बघून त्यांच्या मित्र परिवाराने ऑगस्ट ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत कंपनीत सहा लाख ७० हजार रुपयांची गुंतवणूक केली. तीन महिन्यानंतर पाटील हे गुंतवणुकीच्या परताव्यासाठी कंपनीच्या कार्यालयात गेले. त्यावेळी टोलवाटोलवी करण्यात आली. परताव्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. मात्र काही दिवसांपूर्वी संशयितांनी कार्यालयासह गाशा गुंडाळल्याचे लक्षात आल्यावर पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंतवणूकदारांना आवाहन
या कंपनीत अनेकांनी लाखों रुपयांची गुंतवणूक केल्याचे सांगितले जात आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.