नाशिक : भारतीय रेल्वे आता १०० टक्के विद्युतीकरणाच्या मार्गावर असून इंजिनची कार्यात्मक क्षमता टिकवून ठेवण्यासाठी भारतीय रेल्वे विद्युत अभियांत्रिकी संस्था अर्थात इरिन कुशल मनुष्यबळ तयार करण्याच्या आव्हानांना तोंड देत आहे. या पार्श्वभूमीवर, भविष्याच्या दृष्टीकोनातून अद्ययावत अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत आहे.
भारतीय रेल्वे विद्युत अभियांत्रिकी संस्थेच्यावतीने विद्युत वाहतुकीच्या १०० वर्षाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, इरिनचे महासंचालक रविलेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तीन फेब्रुवारी १९२५ रोजी भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हने काम सुरू केले होते. या संक्रमणामुळे विद्युत अभियंत्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली, त्या अनुषंगाने इरिनला अभ्यासक्रमात बदल करणे क्रमप्राप्त ठरले. वंदे भारत आणि वाढीव उर्जा लागणाऱ्या अवजड रेल्वे गाड्यांमुळे संस्थेच्या आव्हानात भर पडत आहे. प्रतिताशी १६० किलोमीटर वेगासाठी रचनाबद्ध केलेल्या रेल्वेगाड्यांची विजेची मागणी दुप्पट असते. सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये कधीकधी विजेचा व्यत्यय येतो. या आव्हानांना तोंड देण्यासाठी संस्थेने सुधारित अभ्यासक्रम केला असून यामध्ये कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यापूर्वी प्रगत देशातील रेल्वे तंत्रज्ञान आणि भारतातील तंत्रज्ञान यातील मोठे अंतर आता दूर झाले आहे. भारतीय रेल्वेची जगातील कोणत्याही रेल्वेशी तुलना होऊ शकत नाही. जम्मू-काश्मीर ते कन्याकुमारी इतक्या दुर अंतरापर्यंत रेल्वे वाहतुकीची रचना कुठेही नसल्याचे सूचित करण्यात आले.
विद्युत अभियंत्यांची गरज वाढणार
२०१६-१७ पर्यंत देशात ६५ हजार किलोमीटर रेल्वेमार्गापैकी सुमारे ६० टक्के मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने इंधनावर आधारीत अवलंबित्व कमी करण्यासाठी १०० टक्के विद्युतीकरणाची घोषणा केली. सात वर्षांत ९७ टक्के उद्दीष्ठ्य गाठले गेले. पुढील वर्षी १०० टक्के उद्दीष्ठ्य गाठले जाईल. म्हणजे रेल्वेला विद्युत अभियंत्यांची मोठ्या संख्येने गरज भासेल. जे वीज पुरवठ्याच्या समस्या आणि इंजिन कार्यक्षम राखण्यात सक्षम असतील, याकडे रविलेश कुमार यांनी लक्ष वेधले. डिझेलवरील इंजिन काहीअंशी ठेवावे लागतील. ग्रीड फेल होणे वा आपत्तीत अथवा सामरिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्यांचा वापर करावा लागू शकतो.