दुष्काळी स्थितीमुळे गंगापूर आणि दारणा धरण समुहातून विसर्ग होऊ नये म्हणून राजकीय पातळीवर जोरदार प्रयत्न होत असताना दुसरीकडे पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या तयारीला वेग दिला आहे. जायकवाडीचे पथक या प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. विसर्गाआधी धरणांतील जलसाठा, पात्रातील बंधाऱ्यांची पातळी यांचे जायकवाडी आणि नाशिक पाटबंधारे विभागाच्या पथकाकडून संयुक्तपणे मोजमाप प्रगतीपथावर आहे. विसर्गावेळी पाणी चोरी रोखण्यासाठी महावितरण, पोलीस यंत्रणेला सूचित करण्यात आले आहे. ही तयारी बुधवारी सायंकाळपर्यंत पूर्णत्वास जाण्याची शक्यता असून त्यानंतर रात्री उशिरा किंवा गुरुवारी विसर्ग करण्यात येण्याचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> जायकवाडीतील मृतसाठा वापरा; पाणी सोडण्यास भाजपचा विरोध, विसर्ग थांबविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याचे निर्देश दिल्यानंतर स्थानिक पातळीवर बैठकांचे सत्र सुरू होते. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने गंगापूर समुहातून ५०० दशलक्ष घनफूट, दारणा समुहातून २६४३ दशलक्ष घनफूट, मुळा समुहातून २१००, प्रवरा समुहातन ३३६० असे नाशिक व नगर जिल्ह्यातून एकूण ८६०३ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने या समुहांची जबाबदारी सांभाळणाऱ्या पाटबंधारे कार्यालयांनी तयारी सुरू केली. यापूर्वी विसर्ग करताना थेट गंगापूर धरणावर धडक देऊन शेतकऱ्यांनी विसर्ग थांबवला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व पातळीवर खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाने पाणी सोडले जात असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन लाभक्षेत्र विकास प्राधिकरणने केले आहे. गंगापूर समुहातील गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी या धरणांमधून ५०० दशलक्ष घनफूट तर दारणा समुहातील आळंदी, कडवा, भाम, भावली, दारणा, मुकणे आणि वालदेवीतून २६४३ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. यावर जायकवाडी धरणाचे पथक लक्ष ठेवणार आहे. विसर्गावेळी या धरणांची पातळी आणि विसर्गानंतरची पातळी याचे अवलोकन त्यांच्यामार्फत केले जाईल. तसेच गोदावरी व दारणा नदीवर खालील भागात बंधारे आहेत. त्यातील जलसाठ्याचे संयुक्तपणे अवलोकन केले जाईल. त्यामध्ये सध्या जितका जलसाठा आहे, विसर्ग झाल्यानंतर तो पुन्हा तितकाच करून द्यावा लागणार आहे. नदीकाठावरील गावातील वीज पुरवठा बंद करणे, पोलीस बंदोबस्त, बंधाऱ्यांच्या फळ्या काढण्याचे काम सुरू झाले आहे. गोदावरी आणि दारणातून विसर्ग होणार असल्याने या काळात नदीपात्रात बसविलेल्या मोटारी व व इतर साहित्य काढून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विसर्गावेळी नदीपात्रात कुणी उतरू नये, पाळीव जनावरांना जाऊ देऊ नये. विसर्गात अडथळा निर्माण होणार नाही याची नदीकाठच्या रहिवाश्यांनी दक्षता घ्यावी. प्रवाहामुळे काही जीवित वा वित्तहानी झाल्यास त्यास जलसंपदा विभाग जबाबदार राहणार नसल्याचे सूचित करण्यात आले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Irrigation department district administration prepared to release water from gangapur and darna dams zws
Show comments