जिल्ह्यातील नागरिकांना सहजपणे संपर्क साधता यावा, यासाठी राज्याचे जलसंपदा तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उंटवाडी रस्त्यालगतच्या सिंचन भवन परिसरात आपले आलिशान संपर्क कार्यालय थाटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मंत्री महोदयांच्या कार्यालयाच्या जागेची निकड भागविण्यासाठी पाटबंधारे विभागाने थेट आपले विश्रामगृह रिक्त करून देण्याचे औदार्य दाखविले. इतकेच नव्हे तर, आजवर बिकट अवस्थेत राहिलेल्या विश्रामगृहाच्या इमारतीचे रूपडे पालटण्यासोबत या ठिकाणी कोणतीही कमतरता भासू नये म्हणून २० ते २५ लाखाचा निधी मुक्तहस्ते खर्च केल्याचे पुढे आले आहे. या माध्यमातून पालकमंत्र्यांच्या कार्यालयाची सोय झाली, मात्र, शासकीय कामानिमित्त येथे येणाऱ्या पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांची गैरसोय झाल्याचा सूर उमटत आहे.

राज्याच्या जलसंपदा विभागाची धुरा सांभाळणाऱ्या महाजन यांच्यावर नाशिकच्या पालक मंत्रिपदाचीदेखील जबाबदारी आहे. मूळचे जळगावचे असणारे महाजन हे मुख्यमंत्र्यांच्या खास विश्वासू गटातील मानले जातात. नाशिकचे पालकत्व त्यांच्याकडे सोपविण्यामागे कुंभमेळ्याचे नेटके नियोजन करून तो यशस्वी करणे हा भाग होता. कुंभमेळ्यातील शाही पर्वण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल अमेरिकेपासून ते नाशिकपर्यंत त्यांना गौरविण्यात आले. सिंहस्थ नियोजनावेळी पालक मंत्र्यांसाठी स्थानिक पातळीवर कार्यालयाची गरज प्रकर्षांने मांडली गेली. लगोलग जागेचा शोध सुरू झाला. अल्प काळात कार्यालय कार्यान्वित करावयाचे असल्याने तयार इमारतीची आवश्यकता होती. या प्रश्नावर ‘पाटबंधारे’च्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी विश्रामगृहाची जागा देऊन तोडगा शोधल्याचे अधोरेखित झाले आहे.

त्र्यंबकरोड व उंटवाडी या उच्चभ्रू वसाहतीत जलसंपदाचे सिंचन भवन हे नाशिक विभागाचे मुख्यालय आहे. या परिसरातील विश्रामगृहाची दुमजली इमारत संपर्क कार्यालयासाठी देण्याचे निश्चित झाले आणि युध्द पातळीवर नुतनीकरणाचे काम सुरू झाले. उंटवाडी रस्त्यावरून मार्गस्थ होताना दृष्टिपथास पडणाऱ्या या विश्रामगृहाची पूर्वी बिकट अवस्था होती. पाटबंधारेचे वरिष्ठ अधिकारी मुक्कामी येत असूनही कधी रंगरंगोटीचा साधा विचार झाला नव्हता. महाजन यांच्या संपर्क कार्यालयामुळे मात्र या इमारतीचे संपूर्ण रुप बदलले आहे. इमारतीच्या रंगरंगोटीसह चकाचक फरशा, नवीन फर्निचर, बगीचा आदी राजेशाही थाटातील व्यवस्था करण्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले. या कामांवर जवळपास २० ते २५ लाखाचा निधी खर्च होत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तळ मजल्यावर महाजन यांचे कार्यालय आहे. मंत्री महोदय कधी मुक्कामी थांबू शकतील असा विचार करून अन्य दालनांत खास व्यवस्था केली गेली. या कामांसाठी सिंहस्थाचा निधी वापरला गेल्याचे सांगितले जाते. अनेक महिन्यांपासून फारसे कोणाला माहीत नसलेले आणि नव्याने झळाळी प्राप्त झालेले हे कार्यालय नागरिकांना ज्ञात व्हावे म्हणून आता दर्शनी भागात महाजन यांच्या संपर्क कार्यालयाचा फलक झळकवण्यात आला आहे. या माध्यमातून जनसामान्यांना पालकमंत्र्यांकडे दाद मागणे सुकर होणार असल्याचे सांगितले जाते.

अधिकाऱ्यांची गैरसोय

पाटबंधारे विभागाचे विश्रामगृह जलसंपदा मंत्र्यांच्या संपर्क कार्यालयासाठी दिल्यामुळे या विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्यांना या ठिकाणी आरक्षण करता येत नाही. सार्वजनिक पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहात जावे लागते. संपर्क कार्यालयामुळे मंत्र्यांची सोय झाली असली तरी अधिकारी वर्गाची गैरसोय झाल्याची तक्रार राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात दबक्या आवाजात होत आहे. परंतु, ज्या नाशिक जिल्हा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाच्या अखत्यारीत हे विश्रामगृह येते, तेथील अधिकाऱ्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. विश्रामगृहातील एक दालन संपर्क कार्यालयासाठी देण्यात आले आहे. परंतु, उर्वरित दालनांत अधिकाऱ्यांना आरक्षण देता येईल. मंत्री महोदयांच्या संपर्क कार्यालयामुळे अधिकारीच या विश्रामगृहात येण्यास फारसे उत्सुक नाहीत. सध्या वरच्या मजल्यावरील नूतनीकरणाचे काम सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. पालकमंत्र्यांचे संपर्क कार्यालय विविध कारणांमुळे चर्चेत आले आहे. या संदर्भात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनी तसेच इतर माध्यमातून वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही ते उपलब्ध झाले नाहीत.