नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे १३ मे रोजी मुस्लीम समाजातील भाविकांकडून मंदिरात धूप दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरून राज्यात धार्मिक वाद निर्माण झाला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या प्रथा-परंपरेनुसारच आम्ही मंदिरात धूप दाखवण्यास गेलो होतो, अशी प्रतिक्रिया मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करण्याऱ्यांनी दिली होती. यावरून, भाजपा नेते नितेश राणे यांनी मोठा खुलासा केला आहे. आज त्यांनी नाशिकमध्ये जाऊन त्र्यंबकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा >> त्र्यंबकेश्वरला धूप दाखवायची प्रथा आहे की नाही? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
“या भागातील शांतता भंग करणं हा आमचा हेतू नाही. पण सातत्याने १३ मे रोजी घडलेल्या घटनेसंदर्भात जे गैरसमज पसरवले जाताहेत, हिंदूंची बदनामी केली जातेय, त्या सगळ्याबाबतीत गावकऱ्यांच्या इच्छेनुसार, ट्रस्टनुसार आज आम्ही भेट देण्यासाठी येथे आलो. उरूस निघाल्यानंतर मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे धूप दाखवण्याची परंपरा आहे, असं सातत्याने बोललं जातंय. परंतु, हे साफ खोटं आहे. आम्ही यासंदर्भात ग्रामस्थांशी बोललो, विश्वस्तांशी बोललो. अशा कोणत्याही पद्धतीची परंपरा नसल्याचं त्यांनी सांगितलं”, असंही नितेश राणेंनी स्पष्ट केलं.
मग नक्की प्रथा काय?
“उरूस बाहेरच्या परिसरातून निघतो. ते लोक काय करतात? की धूप दाखवतात हा त्यांचा प्रश्न आहे. जिहादी विचारांचे युवक या मंदिरात आले. त्यांनी फेसबूक लाईव्ह केलं. मंदिर बंद असताना मंदिरामध्ये शिरण्याचा हट्ट करण्यात आला. तुम्हाला पूजा-अर्चा करायची आहे तर सगळे जसे येतात तसे आतमध्ये या. आरतीचं सामान घ्या, पूजेचं सामान घ्या. रांगेत उभं राहा, आतमध्ये या. सगळे जसं दर्शन घेतात, हिंदू धर्म प्रथा परंपरेनुसार दर्शन घ्या आणि निघून जा. याला कोणालाही आक्षेप नाही”, असं नितेश राणे म्हणाले. “मंदिरात १०-१५ तरुण आले, टोप्या घालून आले. पण त्यांच्या हातात हिरवे झेंडे होते”, असा आरोपही नितेश राणेंनी केला.