करोना आणि टाळेबंदीचा सर्वाधिक फटका शिक्षण विभागाला
नाशिक : करोना महामारी आणि टाळेबंदीचा सर्वाधिक फटका शिक्षण क्षेत्रास बसला आहे. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी ऑनलाइन पद्धतीने शिकविणे सुरू करण्यात आले असले तरी विद्यार्थ्यांपुढील समस्या कमी झालेल्या नाहीत. प्रत्यक्षात शाळा कधी सुरू होतील, याविषयी अनिश्चितता असताना शाळांकडून चाचणी, सहामाही परीक्षा घेणे सुरू झाल्याने गोंधळात अधिकच भर पडली आहे. परीक्षांमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
नव्या शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा ऑनलाइन पद्धतीने झाला. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा बंद शिक्षण सुरू यानुसार शिकविणे सुरू आहे. खासगी शाळांमध्ये व्हॉट्स अप, झुम मिटींग, गुगल क्लास रूमच्या माध्यमातून मुलांचा अभ्यास सुरू आहे. ऑनलाईन पध्दतीचे बहुतेक शिकविणे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून जात असतांना या धामधुमीत पहिली चाचणी बहुपर्यायी उत्तर पद्धतनुसार घेण्यात आली. परंतु, सहामाही परीक्षा बहुपर्यायीऐवजी नियमित लेखी स्वरूपात घेण्यात येत आहे. सरकारी शाळा, मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये पालकांच्या भ्रमणध्वनीवर प्रश्नपत्रिका पाठविण्यात येत आहे.
काही ठिकाणी शाळेतून उत्तरपत्रिका देण्यात येत आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून पालकांच्या व्हॉटसअप ग्रुपवर प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. यासाठी स्वतंत्र परीक्षा क्र मांक देण्यात आला आहे. परीक्षांचे नियोजन करण्यात आले असतांना विद्यार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभत नसल्याचे चित्र आहे. ऑनलाईन शिक्षणाला कं टाळलेले विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षेकडे दुर्लक्ष के ले आहे.
विद्यार्थ्यांना विशिष्ट वेळेस प्रश्नपत्रिका दिली जात असून दोन तासाचा कालावधी प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी दिला जात आहे. काही विद्यार्थ्यांकडून उत्तरे लिहिताना मार्गदर्शक पुस्तिके चा सर्रास वापर के ला जात आहे. विद्यार्थी भ्रमणध्वनीचा वापर कोणत्या कारणासाठी करतील, याविषयी पालकच साशंक असल्याने काही जण विद्यार्थ्यांकडे भ्रमणध्वनी सोपवीत नसल्याचेही दिसते.
या परीक्षेच्या मूल्यांकनाविषयी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता ऑनलाइन शिक्षणामुळे दिवसागणिक बिघडत असतांना होणाऱ्या परीक्षा, गुण याचा ताळमेळ कसा बसविणार, असे प्रश्न पालकांप्रमाणेच शिक्षकांसमोर आहेत.