दूध संघातील गैरव्यवहाराची चौकशी होईलच
जळगाव – जिल्हा दूध उत्पादक संघातील गैरव्यवहाराची चौकशी योग्य प्रकारे व निष्पक्षपणे होईलच, यासाठी पोलीस प्रशासनासह विविध यंत्रणाही आहेत. एकनाथ खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याने पोलीस ठाण्यासमोर झोपणे अयोग्य आहे, अशी टीका पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. पोलीस प्रशासनावर कोणताही दबाव नसल्याचीही त्यांनी स्पष्टोक्ती दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले की, जिल्हा दूध उत्पादक संघात अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराबाबत अगोदर भाजपतर्फे मागणी करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी मागणी केली आहे आणि आता आम्हीही करतो की, दूध संघात अशा पद्धतीचा भ्रष्टाचार झाला असेल, तर तो कोणाच्या काळात झाला आहे, कोणी केला आहे, याबाबतची निष्पक्षपणे चौकशी झालीच पाहिजे. पोलीस प्रशासनावर राजकीय दबाव नाही. आमचे मित्रपक्ष भाजपनेही पोलीस प्रशासनाला गैरव्यवहारासंदर्भात लेखी तक्रार अर्ज दिला आहे. याचा अर्थ असा होत नाही की, चौकशी होणार नाही. भ्रष्टाचाराच्या या गंभीर प्रकाराची शंभर टक्के चौकशी होईलच. पोलीस प्रशासनावर कोणताही दबाव नाही, असेही ते म्हणाले.