लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : ग्रामीण भागात विकासकामे झाली नाही तर लोक शिव्या देतात. त्यामुळे एखाद्या गावाचा सरपंच होणे एवढे सोपे नाही, त्यापेक्षा जास्त सोपे आमदार होणे आहे. आमदाराचे कसे असते, या गावात मत मिळाले नाही तर दुसऱ्या गावात मिळतात. पण सरपंचांचे तसे नसते, अशी मिश्किल टिप्पणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) मंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केली.

जळगाव जिल्ह्यातील सरपंचांच्या बैठकीचे आयोजन नियोजन समितीच्या सभागृहात शनिवारी करण्यात आले होते. त्याठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत जोरदार भाषण करत हास्याचे मळे फुलवले. हास्यविनोद करत मंत्री पाटील यांनी सरपंचांना कानपिचक्याही दिल्या. विकास कामे न करता फलकबाजीच्या माध्यमातून चमकोगिरी काही जणांकडून कशी केली जाते, हेही गुलाबराव पाटील यांनी मांडले.

मेरे बाप को उसके बापने गिराया था, त्यामुळे चुन चुन के बदला लेंगे, शेत विकून टाकेल पण त्याला पाडणार, अशी मानसिकता गावागावात असते. त्यामुळे गावात हजार मतांपैकी ६०० मते घेणे देखील खूप अवघड असते, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. बऱ्याच गावांमध्ये लाडक्या बहिणी सरपंच आहेत. त्यामुळे त्यांच्या नवरोबांना विनंती आहे की, गावच्या कारभारात डोकावू नका. महिलांना थोडे काम करू द्या, तुम्ही थैली घेऊन त्यांच्या मागे राहा, तुमचे काम तेच आहे. बायको तुमची आयुष्यभर सेवा करते, मग ती सरपंच झाली तर तिच्या मागे उभा राहा ना, काय फरक पडतो, पतीचे काम हे फक्त प्रोत्साहन द्यायचे आहे, असे मंत्री पाटील यांनी नमूद केले.

सरपंच किती काम करतो, हे फलकावर नव्हे तर, जमिनीवर दिसले पाहिजे, काही लोक फलक लावून कार्यसम्राट, भावी आमदार वगैरे वगैरे उपाधी स्वतःच्या नावापुढे लावतात. पण त्यांच्या गावातील गटार ओसांडून वाहत असते. त्याकडे त्यांचे लक्ष नसते. फलकबाजी करण्यापेक्षा पन्नास टक्के तरी त्या गावात तेथील सरपंचाचे काम असले पाहिजे, असेही त्यांनी बैठकीला उपस्थित सरपंचांना सांगितले.