लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : जगाच्या पाठीवर कृषी क्षेत्रात जे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याचा स्वीकार आधुनिक शेतीसाठी व्हावा. कृषी क्षेत्रात मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे. आज मोठ्या प्रमाणात पीक पद्धती बदलत आहे. वातावरणातील बदल, अवकाळी, गारपीट इ. संकटावर मात करून शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत आहे. त्यासाठी कृषीथॉन प्रदर्शन महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालक मंत्री दादा भुसे यांनी केले.

येथे आयोजित कृषीथॉन या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी आ. भुसे बोलत होते. उद्घाटन सोहळ्यास आ. सीमा हिरे, माखासदार हरिशचंद्र चव्हाण, देविदास पिंगळे, दिलीप वाघ, पंजाब नॅशनल बँकेचे महाप्रबंधक नवीन बुंदेला, नाडाचे उपाध्यक्ष अरुण मुळाणे, बार कौन्सिलचे सदस्य जयंत जायभावे, नरेंद्र ठक्कर आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आ. भुसे म्हणाले, राज्यात ७० टक्के क्षेत्रावर कापूस, सोयाबीन पीक घेतले जाते. या क्षेत्रात काम करण्याची आवश्यकता आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून पी.एम.किसान, नमो शेतकरी, एक रुपयात पीकविमा अशा अनेक योजना शेतकरी हितासाठी सुरु करण्यात आल्या आहेत. गेली २५ वर्ष कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा करणाऱ्या न्याहारकराच्या कामाचे भुसे यांनी कौतुक केले.

आणखी वाचा-नाशिक : पाथर्डी शिवार परिसरात बिबट्या जेरबंद

दरम्यान, कृषीथॉन विशेष सन्मान प्राप्त करणाऱ्या पुरस्कारार्थीचा गौरव भुसे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यात आदर्श कृषी अधिकारी सन्मान विवेक सोनावणे यांना,आदर्श मिलेट प्रक्रिया उद्योजक सन्मान महेंद्र छोरीया, आदर्श कृषी उद्योजक सन्मान मधुकर गवळी, कृषी महर्षी सन्मान डॉ. सतीश भोंडे, कृषी महर्षी सन्मान कृष्णा भामरे, आदर्श कृषी शिक्षण विस्तार कार्य सन्मान के.के.वाघ कृषी महाविद्यालय यांचा समावेश आहे.

कृषीथॉनच्या १६ व्या आवृत्तीत तीनशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. ड्रोन, विविध अॅप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह कृषी निविष्ठा संस्था, कंपन्यांनी घेतलेला सहभाग, कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन, कृषी पर्यटन विषयावरचे चर्चासत्र हे यंदाच्या कृषीथॉनचे वैशिष्ट्य आहे. बदलत्या प्रवाहात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान पोहचविण्याचा प्रयत्न अखंडपणे होत आहे. कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसाराचा हा वसा सार्थ ठरवत कृषी क्षेत्रांचे उत्पादन वाढावे, आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे याकरिता विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कार्यक्रमाचे स्वागत संजय न्याहारकर यांनी केले असून प्रास्ताविक साहिल न्याहारकर यांनी केले. आभार अश्विनी न्याहारकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले.