नाशिक : पित्ताशयातील खड्यांच्या शस्त्रक्रियेवेळी डॉक्टरने महिलेची रक्तवाहिनी आणि पित्तनलिकेला दुखापत केल्याचे उघड झाले आहे. चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे ११ लाख रुपयांची नुकसान भरपाईची तयारी दर्शविली गेली. परंतु, नंतर ही रक्कम देण्यास टाळाटाळ करुन डॉक्टरने धमकावल्याची तक्रार महिलेने केली आहे.
याबाबत सौम्या नायर (३०, उपनगर) यांनी तक्रार दिली. डॉ. संतोष रावलानी असे संशयिताचे नाव असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. नायर यांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास होता. त्यामुळे त्या पौर्णिमा बस थांबा परिसरातील संतोष मल्टिस्पेशालिटी आणि डे केअर रुग्णालयात दाखल झाल्या. २३ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर पित्ताशयातील खड्यांची शस्त्रक्रिया झाली. यावेळी निष्काळजीपणामुळे त्यांची पित्त नलिकाच कापून टाकण्यात आली. रक्तवाहिनीसही दुखापत झाली. याबाबत रुग्णालयाने माहिती लपविली.
हे ही वाचा…धुळे: मसाल्यांमध्ये ही भेसळ करुन लोकांच्या आरोग्याशी खेळ
नायर यांनी नंतर नाशिक येथील दुसऱ्या एका आणि पुणे येथील रुग्णालयात उपचार घेतले. त्यानंतर नायर यांनी डॉ. रावलानी यांना गाठून जाब विचारला असता चुकीची कबुली देत ११ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे कबूल केले होते. तक्रारदार महिला आणि त्यांचे वडील शशिधरन नायर या डॉक्टरांकडे गेल्या असता रावलानी यांनी भरपाई देण्यास नकार दिला. ते शशिधरन नायर यांच्यावर मारण्यासाठी धावून गेले. कुठेही जा, एक रुपयाही देणार नाही. तुम्हाला राज्यात राहू देणार नाही, अशी धमकी दिल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.