समाज माध्यमाद्वारे ‘तिला’ शोधले. मेलच्या माध्यमातून समोर आलेली तिची निरागस छबी डोळ्यात साठवत तिच्याशी सुरू झालेला संवाद आज आधाराश्रमापर्यंत येऊन थांबला. ‘सखी’ अगदी नावाप्रमाणे असून पुढील प्रवासात ती आम्हाला आनंद व दु:खात साथ देणार असल्याची प्रतिक्रिया इटलीस्थित दाम्पत्याने व्यक्त केली.
येथील आधाराश्रमात मंगळवारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत सखीचा दत्तक विधान सोहळा पार पडणार आहे.
जानेवारी २०१४ मध्ये आठ दिवसांची चिमुकली पोलिसांच्या सहकार्याने आधाराश्रमात दाखल झाली. तिचे निरागस भाव पाहता आश्रमातील प्रत्येकाची ती आवडती बनली. कर्मचाऱ्यांनी तिचे नाव ‘सखी’ ठेवत देखभालीची जबाबदारी स्वीकारली. सखीचे ओठ जन्मत: फाटलेले होते, तसेच जीभ काही अंशी टाळूला चिटकली असल्याने या व्यंगावर आधाराश्रमाने तातडीने उपचार करण्याचे ठरविले. मात्र तिच्या वयाची अडचण होती. अलीकडेच तिच्या फाटलेल्या ओठांची शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून ती समोरच्याशी बोबडय़ा शब्दात बोलण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, आश्रमाने तिच्याविषयी माहिती केंद्रीय कारा संस्थेकडे कळविली. ‘कारा’ने ही माहिती आपल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून सर्व दत्तक देणाऱ्या संस्थांसाठी खुली केली. इटलीस्थित मानसोपचारतज्ज्ञ बिनाका मारिया सिल्वानी व अ‍ॅड्रिनो इटलो गीस्युपी सोफाइनटिनी या दाम्पत्याला ही माहिती मिळाली. तेथील संस्थेशी चर्चा करत तिला व्यंगासह स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शविली. ‘कारा’ने आधाराश्रमांशी संपर्क साधल्यानंतर दत्तक विधानाशी संबंधित प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणत: नऊ महिन्यांचा कालावधी उलटला. या काळात या दाम्पत्याने तिच्याशी वेळोवेळी संगणकाच्या साहाय्याने संवाद साधला. त्यातून बंध जुळले. सोमवारी जेव्हा त्यांनी सखीला आणि सखीने आई-वडिलांना पाहिले, तेव्हा दोघांच्याही डोळ्यात अश्रू जमा झाले. सखी अश्रूंच्या माध्यमातून साद घालत आईच्या कुशीत विसावली. मंगळवारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत तिचा दत्तक विधान सोहळा पार पडणार आहे.
दरम्यान, संस्थेमधील पाचवे शारीरिक व्यंग असलेले मूल परदेशी दत्तक जात आहे. याआधी आदित्य, समर्थ, परी, नयना यांनी इटलीसह अन्य देशांत आपली घरटी शोधली असून सखी आता इटलीला स्थिरावणार असल्याने संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Story img Loader