नाशिक: महावितरणच्या मालेगाव मंडळ अधीक्षक अभियंतापदी मुख्य कार्यालयाकडून पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आलेले जगदीश इंगळे यांनी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते प्रादेशिक कार्यालय कोकण विभाग, कल्याण येथे कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत होते. महावितरणमध्ये इंगळे यांनी आपल्या प्रदीर्घ सेवेत विविध महत्वाच्या पदावर काम केले आहे.
ऑक्टोबर १९९१ मध्ये तत्कालीन विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांनी सेवेची सुरुवात केली. अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून अंबरनाथ (पश्चिम) उपविभाग येथे तसेच कार्यकारी अभियंता म्हणून सिंधुदुर्ग मंडळ, मुख्य कार्यालय, चाचणी विभाग पेण व प्रादेशिक कार्यालय, कोकण विभाग, कल्याण (गुणवत्ता व नियंत्रण) येथे त्यांनी कार्य केले आहे. मालेगाव मंडळाचे यापूर्वीचे अधीक्षक अभियंता रमेश सानप यांची बदली पायाभूत आराखडा मंडळ, नांदेड परिमंडळ येथे झाली आहे.