बंदीवासात असताना कैद्यांनाही आपल्या कुटुंबाचा काही अंशी आधार बनता यावे, यासाठी कैदी बांधवांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या साहाय्याने प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत बचत खाते उघडण्यात आले आहे. कारागृहात कामातून मिळणाऱ्या कमाईतील काही भाग बचत खात्यात जमा केला तर प्रत्येक कैद्याला त्याचा लाभ होईल. पहिल्या टप्प्यात ३०० हून अधिक कैद्यांनी खाते उघडले आहे.
नाशिकरोड येथील कारागृहात मंगळवारी या अनोख्या उपक्रमांतर्गत कैद्यांना जनधन योजनेचे बँक खाते पुस्तक आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य प्रबंधक विक्रांत पाटील, मध्य कारागृह विभागाचे उपमहानिरीक्षक राजेंद्र धामणे, नाशिकरोड कारागृहाचे अधीक्षक रमेश कांबळे आदी उपस्थित होते.
बँक खाते उघडण्याचे लाभ, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवनज्योती योजना याबाबत पाटील यांनी सविस्तर माहिती दिली. कारागृहात शिक्षा झालेले, न्यायालयात खटला सुरू असणारे एकूण तीन हजार कैदी आहेत. या कैद्यांना कारागृहात वेगवेगळ्या स्वरूपाचे कामही उपलब्ध केले जाते. या कामापोटी संबंधितांना कामाच्या स्वरूपानुसार ४०,५० आणि ५५ रुपये रोज मिळतो. या माध्यमातून कैदी महिन्याकाठी १२०० ते १५०० रुपये कमाई करतात. या कमाईतील काही हिस्सा ते कुटुंबीय आणि भविष्यात स्वत:साठी सुरक्षित ठेवू शकतात. या संदर्भात कारागृहात आवाहन करण्यात आले.
दरम्यानच्या काळात कैद्यांची बचत खाती उघडली जावीत यासाठी महाराष्ट्र बँकेशी चर्चा केली गेली. कारागृहाच्या आवाहनास पहिल्या टप्प्यात साधारणत: ३०० ते ४०० कैद्यांनी प्रतिसाद दिल्याचे कांबळे यांनी नमूद केले. पुढील काळात या उपक्रमास अन्य कैदी प्रतिसाद देतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. दरम्यान, कारागृहातील बेकरीचे उद्घाटन धामणे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Story img Loader