जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघातील चौदा टन लोणी (बटर) व नऊ टन दूध भुकटीच्या चोरीप्रकरणी पोलिसांवर दबाव जाणवत असून, ते गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असून, सध्याचे ठिय्या आंदोलन आम्ही तूर्त स्थगित करीत असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री तथा आमदार एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी केली. यामुळे गुरुवारी दुपारी चारपासून सुरू असलेले आंदोलन संपुष्टात आले. दरम्यान, सकाळी आंदोलनस्थळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट देत पोलीस अधीक्षकच राजकीय दबावाखाली असल्याचा आरोप केला.
हेही वाचा : पक्षाला संजय राऊतांसारखा उत्तम प्रवक्ता हवा आहे… आहे का कुणी?
यावेळी प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले की, दूध संघातील चोरीप्रकरणी चोवीस तास होऊनही गुन्हा दाखल होत नाही, हे राज्याचे दुर्दैव आहे. ज्यांच्यावर चोरीचा आरोप आहे, ते फरार होण्यास पोलीस प्रशासनाची दिरंगाई कारणीभूत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याशी स्वतः मी, खडसे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील व इतर सर्व संचालकांनी चर्चा केली. त्यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मुंढेंवर राजकीय दबाव दिसून येतो. त्यांना गुन्हा दाखल करण्यास भीती वाटत असल्याचे दिसून येते. अपहार व चोरी यांच्यात फरक आहे. अपहार लेखापरीक्षकाकडून शोधून काढावा लागतो. तसे झाल्यावर लेखापरीक्षकाकडून गुन्हा दाखल करण्याच्या सूचना द्याव्या लागतात. चोरी झाल्यास चौकशीसाठी गुन्हा दाखल करावा लागतो. पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे व पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे दबावाखाली असल्याचे दिसून आले. पोलीस प्रशासन स्वतःचे कर्तव्य टाळत आहेत. राज्यातील नव्या सरकारने फक्त सर्व कायदे धाब्यावर बसविण्याचे काम केले आहे. हे शहर पोलीस ठाण्याचे उदाहरण आहे. खडसेंनी गुरुवारपासून ठिय्या मांडला आहे. साधा गुन्हा दाखल करा, नंतर चौकशी करा, अशीही विनंती त्यांनी केली, असे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, दूध संघातील चोरी प्रकरणी पोलिसांवर दबाव जाणवत असून, ते गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असून, सध्याचे आंदोलन आम्ही तूर्त स्थगित करीत असल्याची घोषणा आमदार खडसेंनी केली. यामुळे गेल्या सतरा तासांपासून सुरू असलेले आंदोलन संपुष्टात आले. याप्रसंगी खडसे यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे आणि मी अशी चर्चा केली. पोलीस अधीक्षकांकडे दबाव आहे. ते चर्चेप्रसंगी दिसून आले. चोरीचा गुन्हा दाखल करा, अशी विनंती केली. जयंत पाटील यांनीही तसे सांगितले. मात्र, चौकशी करून गुन्हा दाखल करूच, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. कधी दाखल करणार असे विचारले, तर त्यांनी टाळाटाळ केली. आता न्यायालयात दाद मागणार आहे, असे सांगत याप्रकरणी योग्यवेळी विधानसभा, गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे. सरकारला त्याची नोंद घेण्यास भाग पाडू. चोरीची नोंद होत नसेल तर हे या राज्याचे दुर्दैव आहे. हे बरोबर नाही, असे ते म्हणाले.
हेही वाचा : नाशिक : कामगारांना बँकेत वेतन न दिल्यास कारवाई ; कंत्राटदारांना मनपाचा इशारा
पोलीस ठाण्यात रात्रभर खडसेंचा ठिय्या
दरम्यान, जिल्हा दूध उत्पादक संघातील चौदा टन लोणी (बटर) व नऊ टन दूध भुकटीच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यातच रात्रभर ठिय्या देऊन मुक्काम ठोकल्यानंतर शुक्रवारी दुसर्या दिवशीही आमदार खडसे यांचे आंदोलन सुरूच होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सकाळी खडसेंची भेट घेतली. दरम्यान, रात्री पोलीस ठाण्यातच खडसेंनी जेवण केले. त्यांचा रक्तदाबही डॉक्टरांकडून तपासण्यात आला.
दूध संघातील विक्री गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा यासाठी शहर पोलीस ठाण्यात आमदार खडसे यांनी रात्रभर ठिय्या मांडला. गुरुवारी त्यांनी सायंकाळी तेथेच साबूदाण्याच्या खिचडीचा फराळ केला, रात्री त्यांनी तेथेच भोजन मागविले. खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांही आवारातच कढी-खिचडी तयार करून याचा आस्वाद घेतला.शुक्रवारी (14 ऑक्टोबर) दुसर्या दिवशी खडसेंचे ठिय्या आंदोलन सुरूच आहे. जिल्हा दौर्यावर आलेले पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. याप्रसंगी जयंत पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि खडसे यांच्यासोबत चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले. याप्रकरणी न्यायालयात जाण्यासह सर्व मार्गांचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी, दूध संघात अपहार नव्हे; तर चोरी झाली आहे. यामुळे तातडीने गुन्हा दाखल करावा. मात्र, पोलीस प्रशासनावर सत्ताधार्यांचा दबाव असल्यामुळेच गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही केला. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असे सांगितले
हेही वाचा : लष्करी अभियंत्यांना एक लाख १६ हजारांची लाच स्वीकारताना अटक
कोट्यवधींचा गैरव्यवहार
दरम्यान, अकरा ऑक्टोबरला दूध संघाचे अधिकारी संदीप झाडे, स्वप्नील कार्ले, नितीन पाटील, एन. व्ही. पाटील, प्रशांत बावस्कर यांनी दूध भुकटीची तपासणी केली असता नऊ मेट्रिक टन मालाची तफावत आढळून आली. लोणी व भुकटी प्रकरणात एक कोटी वीस लाखांवर अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याआधारे विक्री विभागातील अधिकारी अनंत अंबिकर, महेंद्र नारायण केदार, कामगार ठेक्यांतर्गत सहाय्यक सुनील चव्हाण यांनी संगनमत करून चौदा टन लोणी (बटर)च्या खोट्या नोंदी घेतल्या तसेच नऊ टन दूध भुकटीची परस्पर विल्हेवाट लावून एक कोटी वीस लाखांवर अपहार केल्याचा जबाब सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यांनी घेतला आहे.