जळगाव – तालुक्यातील वावडदा गावातील शेतशिवारात दरोडेखोरांच्या हल्ल्यात रखवालदाराला प्राण गमवावे लागल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली.जळगाव तालुक्यातील जळगाव – पाचोरा रस्त्यावरील वावडदा शिवारात बिलवाडी येथील ईश्वर पाटील (५२) यांचे शेत आहे. शेताची राखण करण्यासाठी पांडुरंग पाटील (५२, रा. बिलवाडी) हे गेले होते. मंगळवारी मध्यरात्री शेतामध्ये दरोडेखोरांनी  प्रवेश केला. त्यांनी रोटाव्हेटर व ट्रॅक्टर लांबविले. दरोडेखोरांनी ट्रॅक्टरचे सामान असलेल्या लोखंडी अवजड वस्तूने पाटील यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. रोटाव्हेटर व ट्रॅक्टर घेऊन दरोडेखोर पसार झाले. बुधवारी सकाळी शेतमालक ईश्वर पाटील यांचा मुलगा राजेंद्र हा म्हशीचे दूध काढण्यासाठी शेतात गेला असता घटना उघडकीस आली. त्याने गावातील पोलीसपाटील सुवर्णा उंबरे आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे  निरीक्षक जयपाल हिरे व इतर अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ  तपासणी सुरू केली आहे. दरम्यान, शेतातून चोरून नेलेले ट्रॅक्टर हे एरंडोल तालुक्यातील खडके फाटा येथे आढळून आले. मृत पांडुरंग पाटील यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon district security guard dies in attack by robbers amy