जळगाव : शहरातील सराफ बाजारात सोने, चांदीच्या दरातील उच्चांकी घोडदौड सुरूच असून, मागचे सर्व उच्चांक मोडीत काढून सोने, चांदी दरात दररोज नवीन उच्चांक निर्माण होत आहेत. बुधवारी सोन्याचे दर उच्चांकी प्रति तोळा ९१ हजार ८७६ रूपये आणि चांदी प्रति किलो एक लाख पाच हजार ६० रुपयांपर्यंत पोहोचली. जळगावमध्ये १४ मार्च रोजी उच्चांकी ९१ हजार ४६४ रुपयांपर्यंत पोहोचलेले २४ कॅरेट सोन्याचे दर नंतरच्या तीन-चार दिवसात थोडे खाली आले होते. मात्र, मंगळवारी पुन्हा मोठी दरवाढ झाली होती. त्यात बुधवारी ४०० रुपयांनी वाढ नोंदवण्यात आल्यानंतर सोन्याने ९१ हजार ८७६ रुपये प्रति तोळा असा नवा उच्चांक प्रस्थापित केला. दरात सातत्याने होत असलेली वाढ लक्षात घेता सोने आगामी दिवसात एक लाख रुपयांचा आकडा गाठण्याची शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.

जगभरातील आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेमुळे सोन्यात गुंतवणुकीचा ओघ वाढतच आहे. यामुळे जळगावमधील सराफ बाजारातही सोने दराने नवा विक्रम नोंदवला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत असल्याने त्याच्या किमतीत सतत वाढ होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जागतिक मंदीची भीती तसेच व्याज दरातील अनिश्चितता आणि अमेरिकेच्या व्यापार तसेच आर्थिक धोरणांमुळे सोन्याच्या बाजारात तेजीचे चित्र कायम आहे. याशिवाय गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत असल्याने बाजाराला अधिक चालना मिळत आहे.

चांदीचा तोरा कायम

जळगावच्या सुवर्ण बाजारात ऑक्टोबर २०२४ मध्ये चांदीला उच्चांकी एक लाख चार हजार रुपये प्रति किलोचा दर मिळाला होता. त्यानंतरच्या काळात सातत्याने चढ-उतार सुरू असलेले चांदीचे दर मंगळवारी मागचा उच्चांक मोडीत काढून प्रति किलो एक लाख पाच हजार ६० रुपयांपर्यंत पोहोचले. तेजी कायम राहिल्याने दुसऱ्या दिवशी बुधवारीही चांदीचा तोरा कायम असल्याचे दिसून आले.

Story img Loader