जळगाव – शहरातील सराफ बाजारात सोमवारी २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा एक लाख ४२५ रुपयांपर्यंत पोहोचले होते. मंगळवारी दुपारपर्यंत १८५४ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्याने सोन्याचे दर एक लाख दोन हजार २७९ रुपयांपर्यंत पोहोचले. हा सोने दराचा नवीन उच्चांक आहे.
जळगावमध्ये शनिवारपर्यंत ९८ हजार ७७७ रुपयांपर्यंत असलेल्या सोन्याच्या दरात सोमवारी दुपारी, सायंकाळी आणि रात्री, अशी तीनवेळा दरवाढ झाली. एकाच दिवसात १६४८ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्यानंतर सोन्याने अखेर एक लाखांचा टप्पा ओलांडला. सराफ बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सोने दरातील ही वाढ अनपेक्षित नसून जागतिक पातळीवर घडणाऱ्या विविध घडामोडींचा परिणाम आहे. आणि त्यात लवकर स्थिरता येण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. त्यामुळे सोन्याच्या किमती अजून काही दिवस तरी उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.
पुढे अक्षय्य तृतियेचा सण आणि मे महिन्यातील लग्नसराई असताना, सोन्याचे दर कमी होण्याची वाट ग्राहक पाहत होते. मात्र, दर कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहेत.
जागतिक बाजारपेठेतील व्यापारी तणाव आणि डॉलरच्या सततच्या घसरणीमुळेही सोन्याच्या किमती सतत वाढत आहेत. चीन आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाला तर ठीक, अन्यथा सोन्याच्या किमतीत आगामी काळात आणखी वाढ होण्याची शक्यता सुवर्ण व्यवसायातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
चांदीच्या दरात पुन्हा वाढ
जळगावमध्ये सोमवारी चांदीचे दर जीएसटीसह प्रतिकिलो ९९ हजार ३९५ रुपयांपर्यंत होते. मंगळवारी ५१५ रुपयांची वाढ नोंदविण्यात आल्यानंतर चांदीचे दर प्रतिकिलो ९९ हजार ९१० रुपयांपर्यंत पोहोचले. सोन्याच्या तुलनेत चांदीत काही दिवसांपासून फार मोठे चढ-उतार अनुभवण्यास मिळालेले नाहीत. त्यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे.