लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव : शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर संधी मिळेल तेव्हा कव्वाली सादर करण्यासह मिरवणुकीत ठेका धरण्यासही ते कधीच मागे पुढे पाहत नाहीत. धरणगाव तालुक्यातील पाळधीत पार पडलेल्या भवानी मातेच्या यात्रोत्सवात तर त्यांनी चक्क हातात त्रिशूल धरून नृत्य केले.

जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पाळधी हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे जन्मगाव असून, त्याठिकाणी दरवर्षी चैत्र पौर्णिमेला भवानी मातेचा यात्रोत्सव साजरा केला जातो. मंत्रिपदाचा बडेजाव न मिरवता त्यात सहभागी होऊन मंत्री पाटील यांनी यंदाही ग्रामस्थांचा उत्साह वाढविण्यासाठी थेट हातात त्रिशूल धरून पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य केले. याशिवाय भवानी मातेचा जयघोष केला. मंत्री पाटील यांच्या त्या कृतीने ग्रामस्थ भारावले.

दुसऱ्यांदा जळगावच्या पालकमंत्रीपदाचा मान मिळालेले गुलाबराव पाटील त्यांच्या विनोदी शैलीतील भाषणांमधून विरोधकांना नेहमीच लक्ष्य करीत असतात. परंतु, त्याचवेळी उत्साहाच्या भरात, बोलण्याच्या ओघात सत्ताधारी पक्षाला अडचणीत आणणारी विधानेही त्यांच्याकडून अधुनमधून होत असल्याचे दिसून येते. जळगावात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमातंर्गत तालुकास्तरावरील विजेत्या शाळांना शनिवारी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. जळगाव ग्रामीणमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सध्या एकूण ४५ हजार विद्यार्थी आहेत, त्यामध्ये अलिकडच्या काळात कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. अनेक शाळा पुरेशा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्याविषयी या कार्यक्रमात चिंता व्यक्त करताना पालकमंत्री पाटील यांनी शिक्षकांना दुसऱ्या शाळांमधील विद्यार्थी पळवून पटसंख्या वाढविण्याची नामी युक्ती सांगितली.

मंत्री पाटील यांनी नंतर आपल्या वक्तव्याविषयी सारवासराव करण्याचा प्रयत्न केला. विनोदाने बोलून गेलो. जसे आम्ही एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते आमच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करतो, तसे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत करावे, एवढेच म्हणायचे होते. यामध्ये दुसरा चुकीचा भाव नव्हता, पटसंख्या कशी वाढेल हे सांगण्यासाठी थोडा विनोद केला, असे त्यांनी नमूद केले. आयुष्यात आपण यापूर्वी बऱ्याच लोकांना त्रास दिला. मात्र, शिक्षकाला कधीच त्रास दिला नाही. कारण शिक्षकांबद्दल आमच्या मनामध्ये एक वेगळे स्थान आहे, असे पाटील यांनी सांगितले. परंतु, त्यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले. त्यांच्या त्या विधानानंतर राज्यभर विरोधकांनी टिकेची झोड उठवली.

राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही त्यावरून मंत्री पाटील यांना टोला हाणला. सरकार आता विद्यार्थ्यांना फोडण्यासाठी त्यांच्यामागे देखील ईडी, सीबीआय आणि आयटी चौकशीचा ससेमिरा लावणार का, असा प्रश्न देखील उपस्थित केला. याशिवाय, मंत्री गुलाबराव पाटील यांनी विद्यार्थी फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांमध्ये पुरेशा सुविधा आणि शिक्षकांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारावी. त्यामुळे शाळांसमोर विद्यार्थ्यांच्या रांगा लागतील, असेही रोहित पवार यांनी एक्सवरील संदेशात म्हटले आहे.