जळगाव : शहरात जिल्हा प्रशासनासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र, मेरा युवा भारत, राष्ट्रीय सेवा योजना आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या विद्यमाने बुधवारी ‘जय शिवराय – जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. सहभागी विद्यार्थ्यांनी शिवकालीन शस्त्रकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.
छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात सकाळी नऊला शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष प्रतिभा शिंदे, सचिव राम पवार उपस्थित होते.खासदार वाघ यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन करून उपस्थितांना प्रतिज्ञा दिली. त्यानंतर शाहीर विनोद ढगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राज्यगीत सादर केले. तद्नंतर पदयात्रेला सुरुवात झाली.
पदयात्रेत फुलांनी सजवलेल्या रथावर राजमाता जिजाऊ आणि बालशिवाजी यांची वेशभूषा साकारलेले बालकलाकार स्थानापन्न झाले होते. युवराज माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी यांसारख्या शिवकालीन शस्त्रकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. अनिता पाटील आणि चंचल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी स्तंभ आणि विविध योगासने सादर झाली. आदिवासी विकास विभागाच्या प्रयत्नांनी सादर झालेल्या पारंपरिक आदिवासी नृत्याने पदयात्रेची शोभा वाढवली. लेझीम व ढोल ताशा पथकानेही उपस्थितांची मने जिंकली. शहरातील बहुतांश सर्व शाळांनी पदयात्रेत सहभाग नोंदवला.