जळगाव जिल्हा परिषदेवर खडसे गटाचे वर्चस्व असल्याचे सिद्ध झाले आहे. भाजपच्या उज्ज्वला मच्छिंद्र पाटील अध्यक्षपदी, तर नंदकुमार महाजन उपाध्यक्षपदी निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना आघाडीच्या उमेदवारांचा पराभव केला. जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. अध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार उज्ज्वला मच्छिंद्र पाटील यांना ३७ मते मिळाली, तर पक्षाचेच उपाध्यक्षपदाचे उमेदवार नंदकुमार महाजन यांनाही ३७ मते मिळाली.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेना आघाडीच्या उमेदवार जयश्री पाटील यांना २७ मते मिळाल्याने त्या पराभूत झाल्या. निवडणुकीपूर्वी सत्तेसाठी एकत्र येण्यासाठी भाजप व शिवसेनेत एकमत होत नसल्याने अखेरीस शिवसेनेने राष्ट्रवादीशी घरोबा केला. मात्र या निवडणुकीत दोन्ही पक्षांना भाजपला शह देण्यात अपयश आले.
काँग्रेसच्या चारही सदस्यांनी भाजपला मतदान केले. तर राष्ट्रवादीचे तीन सदस्य या निवडणुकीस गैरहजर राहिले. अध्यक्षपदासाठी भाजपला ३४ चा जादुई आकडा गाठणे आवश्यक होते. भाजपचे ३३ सदस्य असल्याने त्यांना केवळ एका मताची आवश्यकता होती. दरम्यान काँग्रेसमधून एक आणि राष्ट्रवादीचे ४ असे पाच सदस्य संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला होता. सत्ता स्थापन करताना विरोधी पक्षातील सदस्य फोडून मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती भाजपने आखल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने एकत्र येण्याचे संकेत दिले होते. त्यांच्यात झालेल्या वाटाघाटीत अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर उपाध्यक्षपद शिवसेनेना देण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. दुसरीकडे अध्यक्षपदाचा उमेदवार कोण? यावर माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात एकमत होत नव्हते. यावर गेल्या ४८ तासांत पाच बैठका झाल्यानंतर ऐनवेळी नाव निश्चित करण्यात आले. यानुसार आज दुपारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली.
अध्यक्षपदासाठी भाजपतर्फे एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक तथा शिवसेनेतर्फे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राहिलेले मच्छिंद्र पाटील यांच्या पत्नी कासोदा-आडगाव गटातील उज्ज्वला पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला. तर राष्ट्रवादीने जयश्री पाटील यांचा अर्ज दाखल केला. उपाध्यक्षपदासाठी भाजपतर्फे रावेर तालुक्यातील निंभोरा तांदलवाडी गटाचे नंदकुमार महाजन व शिवसेनेतर्फे गोपाळ चौधरी यांचा अर्ज दाखल करण्यात आला. कोणीही अर्ज माघारी न घेतल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. यात उज्ज्वला पाटील व नंदकुमार महाजन या दोघांनाही प्रत्येकी ३७ मते मिळाली.
गेल्या काही महिन्यांपासून खडसे सक्रिय राजकारणापासून दूर असले तरी, ‘मिनी मंत्रालया’त त्यांच्याच समर्थकांची वर्णी लागल्याने त्यांच्या गोटात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.